संगीत क्षेत्र ग्रामीण भागात पोहचवण्याचे गोविंद बेडेकरांचे प्रयत्न कौतुकास्पद – खा. विनय सहस्रबुद्धे
Share
पुणे, दि. २७ – संगीत ही अशी साधना आहे जी थेट परमेश्वराशी जोडली जाते, अशा संगीत क्षेत्राला ग्रामीण भागात गुरुकुल पद्धतीने पोहचण्याचे मोठे कार्य गोविंदराव बेडेकर करत आहेत. हे अत्यंत कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खा. डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी आज येथे काढले. संगीताचार्य पं. द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानच्या वतीने
रसिकाग्रणी गोविंदराव बेडेकर यांचा अमृत महोत्सवानिमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी चिन्मय मिशनचे आचार्य स्वामी तेजोमयानंदजी, पद्मभूषण हरिप्रसाद चौरासिया, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, प्रतिष्ठानचे विश्वस्त शेखर गायकवाड, किर्लोस्कर फेरसचे एमडी अरविंद जगताप आणि गोविंदराव बेडेकर सपत्नीक व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. सहस्त्रबुध्दे पुढे म्हणाले की, संगीत, गायन असे कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन करणे हे तितकेच महत्त्वाचे आहे आणि हे कार्य गोविंदराव बेडेकर गेली ४० वर्षे मोठया निष्ठेने करत आहेत. एका अर्थाने ही संगीत साधनाच आहे. सर्वच मोठे कलाकार त्यांच्याकडे सहजपणे कला सादर करायला येतात, हे प्रशंसनीय आहे. संगीत मैफल आयोजनाच्या बरोबरीने गोविंदराव बेडेकर गुरुकुलाची गुरु-शिष्य परंपरा जोमाने पुढे नेत आहेत आणि ते देखील पडद्यामागे राहून. एका अर्थाने ते संयोजक शिरोमणी आहेत. त्यांनी अनेक माणसे जोडली आहेत. त्यामुळे या पुढील काळात त्यांनी अनुभवावर आधारित पुस्तक लेखनही करावे.
स्वामी तेजोमयानंदजी यांनी मनोगतात गोविंदराव यांच्या कार्याला सदिच्छा दिल्या आणि यापुढील काळात गुरुकुलाची प्रगती होत राहो अशी इच्छा व्यक्त केली. माजी राज्यपाल पाटील यांनी गोविंदराव यांच्या कार्याचा आढावा घेतला आणि या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली याबाबत आनंद व्यक्त करून गोविंदरावांसोबतचा स्नेह व्यक्त केला. प्रतिष्ठानचे विश्वस्त शेखर गायकवाड, गुमास्ते यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
सुरुवातीला प्रतिष्ठानच्या
विश्वस्त मंजुषा पाटील यांनी प्रास्ताविक व सर्वांचे स्वागत केले. ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले. यावेळी जोशी बिल्डकॉनचे एच. पी. जोशी यांनी संगीत शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांसाठी तीन वर्षासाठी शिष्यवृत्त्ती योजना जाहीर केली.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांनी गोविंदराव बेडेकर यांची मुलाखत घेतली. यावेळी आपल्या जीवन प्रवासाविषयी बोलताना बेडेकर म्हणाले की, माझे आवडते व्यक्तिमत्त्व म्हणजे भारतरत्न स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी. दैनिक केसरी मध्ये विविध पदांवर केलेल्या कामाचा अनुभव तसेच संतवाणी कार्यक्रमाचा झालेला प्रारंभ, याबरोबर सुरु असणारा केटरिंगचा व्यवसाय, सवाई गंधर्व महोत्सवातील कोषाध्यक्षची जबाबदारी, कार्याचा आढावा आणि काणे प्रतिष्ठानची स्थापना याबरोबरच ज्येष्ठ, श्रेष्ठ कलाकारांसमवेत आलेले सुखद अनुभव, आनंदी क्षण सांगितले.

शेखर गायकवाड, डॉ. विनय सहस्रबुद्धे, स्वामी तेजोमयानंद, बेडेकर, मंजुषा पाटील, हरिप्रसाद चौरसिया, श्रीनिवास पाटील व अरविंद गुमास्ते