aappansare.in

Social

भारतीय विद्या भवनमध्ये रंगला नृत्यविषयक परिसंवाद !

Share

भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन

पुणे :भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित ‘दक्षिणा’ या नृत्य विषयक परिसंवाद आणि नृत्य सादरीकरण  कार्यक्रमाला रविवारी सायंकाळी चांगला प्रतिसाद मिळाला. ‘निर्विकल्प’ संस्थेच्या वतीने हा कार्यक्रम प्रस्तुत करण्यात  आला..ज्येष्ठ नृत्य गुरु शमा भाटे,सुचित्रा दाते,डॉ.परिमल फडके   यांनी विचार मांडले.डॉ.सहाना सेल्व्हगणेश, पूजा काळे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. नृत्य क्षेत्रातील गुरुशिष्य परंपरा, विविधनृत्यशैली,आव्हाने, बदल, ऑनलाईन प्रशिक्षण यावर मान्यवरांनी मते मांडली. डॉ.सहाना सेल्व्हगणेश (भरतनाट्यम),अनेरी  शेठ (मोहिनी अट्टम),सच्चीदानंद नारायणकर(भरतनाट्यम ), शर्वरी जमेनीस(कथक) यांनी बहारदार नृत्य सादर केले.या सादरीकरणांना उपस्थितांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

नृत्यविषयक परिसंवादात बोलताना डावीकडून सुचित्रा दाते, डॉ. परिमल फडके, शमा भाटे,पूजा काळे,डॉ.सहाना सेल्व्हगणेश

शमा भाटे यांनी गुरु कोणाला म्हणावे याबाबत मार्गदर्शन केले.त्या म्हणाल्या,’गुरुपदाला कोण पोचू शकतो याबाबत आपल्या परंपरेत मार्गदर्शन करण्यात आले आहे. साधना नसेल, शिष्याची जबाबदारी घेता येत नसेल तर गुरु म्हणवता येणार नाही. ज्ञानग्रहण करण्याची शिष्यांची क्षमताही महत्वाची आहे. स्वतः शिकलेल्या नृत्यशैली व्यतिरिक्त इतर शैली माहित असणेही आवश्यक आहे. त्यातील देवाण घेवाण माहित असावी’.

सुचित्रा दाते म्हणाल्या,’ आपल्या देशात गुरु शिष्य परंपरा आहे. परदेशात ती नाही. गुरु शिष्यातील बंध वृद्धिंगत झाले पाहिजेत. कौशल्ये शिकावीत,मात्र केवळ समाजमाध्यमांवर पोस्ट करण्यापुरते ते मर्यादित नसावे. कलावृद्धीसाठी कंपन्यांच्या सीएसआर निधीची मदत होते का,हे पाहिले पाहिजे.’

 डॉ.परिमल फडके म्हणाले,’गुरुकुलात राहून २४ तास शिकणे आणि आता क्लास अटेंड करणे यात फरक आहे. अनेक क्लास अटेंड करण्याचीही पद्धत आहे.शिष्यांच्या प्रगतीत गुरुंबरोबर पालकांचे योगदान देखील महत्वाचे आहे. शिष्य कोणत्या शैलीला पुढे घेऊन जाणार, त्यासाठी त्यांनी पूर्ण लक्ष केंद्रीत केले पाहिजे. कलाकारांनी सोशल मीडियाशी मैत्री करून कला पोहोचवत राहिले पाहिजे.’‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले.हा कार्यक्रम विनामूल्य होता .भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा २२६ वा कार्यक्रम होता .रसिका गुमास्ते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.वैष्णवी श्रीनिवासन, सजल डे यांनी सूत्रसंचालन केले.

भरतनाट्यम नृत्य सादर करताना चेन्नईच्या नृत्यांगना डॉ.सेल्व्हगणेश

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Up