aappansare.in

Social

ज्येष्ठ संस्कृततज्ञ, लेखक, पत्रकार पं. वसंतराव गाडगीळ यांचे निधन…

Share

पुणे, दि. 18 – ज्येष्ठ संस्कृत तज्ञ, शारदा ज्ञानपीठमचे संस्थापक, ज्येष्ठ पत्रकार, लेखक, प्रकाशक, भांडारकर संस्थेच्या नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष पं. वसंत अनंत गाडगीळ (वय 94) यांचे आज सकाळी पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. आज सकाळी 11 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. सांस्कृतिक चळवळीतील एक झपाटलेलं व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
आपले संपूर्ण आयुष्य संस्कृत भाषेच्या प्रचार प्रसारासाठी समर्पित करणारे संस्कृततज्ञ असलेल्या पंडितजींचे पुण्यातील असंख्य धार्मिक-सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांशी जवळचे संबंध होते. हिंदू धर्मशास्त्राचे अभ्यासक असलेल्या पंडितजींनी ऋषीपंचमीला
ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वांचा सत्कार करण्याचा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून हाती घेतला होता. त्यांनी काही वर्षे पत्रकारिता देखील केली. शारदा या मासिकाचे ते संस्थापक संपादक होते. त्यांनी असंख्य पुस्तकांचे प्रकाशन केले होते. त्यातील अत्यंत महत्वाचा ग्रंथ म्हणजे ग. बा. पळसुले यांचे स्वातंत्र्यवीर सावरकरांची जीवनगाथा असलेले महाकाव्य “वैनायकम” हे आहे. संस्कृत भाषेच्या प्रचार प्रसारासाठी त्यांनी अहोरात्र काम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांच्या कार्याची विशेष दखल घेतली होती. संस्कृतचे एक चालतं बोलतं विद्यापीठ गेले, असेच त्यांच्याबाबत म्हणावे लागेल.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Up