aappansare.in

Motivational

अदानी महाराष्ट्र प्रिमियर लीग (एमपीएल) स्पर्धेत प्लेऑफच्या शर्यतीत कोल्हापूर टस्कर्स वि. सातारा वॉरियर्स आणि रायगड रॉयल्स वि. ईगल नाशिक टायटन्स यांच्यात महत्त्वपूर्ण लढती रंगणार 

Share

पुणे, १७ जून २०२५:  महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रिमियर लीग (एमपीएल) स्पर्धेत आज ( बुधवार, दि. १८ जून रोजी) पीबीजी कोल्हापूर टस्कर्स व सातारा वॉरियर्स संघात सामना होणार आहे.

सोमवारी पावसामुळे तीनही सामने रद्द करावे लागले होते व सर्व संघाना प्रत्येकी एक एक गुण देण्यात आला होता. सातारा वॉरियर्स संघासाठी प्लेऑफ मध्ये प्रवेशाच्या दृष्टिकोनातून हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. आत्तापर्यंत साताऱ्याचा संघ गुणतालिकेत तळाच्या स्थानी आहे, पण मंगळवारी रात्री त्यांच्या संघाचा सामना रायगड रॉयल्स विरुद्ध होणार आहे. या सामन्यात विजय त्यांनी मिळवल्यास ते नेट रन रेटच्या आधारावर चौथ्या क्रमांकावर येऊ शकतात.

सातारा वॉरियर्स संघाने अखेरच्या लढतीत रत्नागिरी जेट्सवर सहजगत्या विजय मिळवला होता. आयपीएल खेळाडूराजवर्धन हंगर्गेकरने (३-१४) असा भेदक मारा केला होता, त्यामुळे त्याच्याकडून संघाला मोठी अपेक्षा असणार आहे. तर फलंदाजीत सलामीवीर पवन शहाला गवसलेला सूर साताऱ्यासाठी जमेची बाजू ठरेल.

दुसऱ्या बाजूला, पीबीजी कोल्हापूर टस्कर्सने रायगड रॉयल्सवर दोन गडी राखून थरारक विजय मिळवला होता. गेल्या दोन सामन्यात कोल्हापूरने युवा खेळाडू सचिन धसला सलामीला बढती दिली आहे व संधीच सोनं करत त्याने ६० व २९ धावांची आक्रमक खेळी केली आहे. तर कर्णधार राहुल त्रिपाठीला देखील चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन सूर गवसला आहे. त्याने पहिल्या सामन्यात ४५ तर दुसऱ्या सामन्यात ५३ धावा केल्या होता. राहुलच्या अर्धशतकाच्या जोरावर कोल्हापूरने रायगडला पराभूत केले होते. त्यामुळे कोल्हापूरला बदललेल्या फलंदाजीच्या क्रमवारीचा फायदा होत राहील अशी अपेक्षा कर्णधार राहुलला असेल.

एमपीएल स्पर्धेत सर्वाधिक महागडा खेळाडू ठरलेल्या अनुभवी रजनीश गुरबानी गोलंदाजीत आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा कोल्हापूरला करून देत आहे, त्यामुळे पीबीजी कोल्हापूर टस्कर्स व सातारा वॉरियर्स संघातील लढत अत्यंत चुरशीची होईल यात वाद नाही.

बुधुवारी होणाऱ्या पहिल्या सामन्यात रायगड रॉयल्स संघ ईगल नाशिक टायटन्स संघाला भिडेल. नाशिकच्या संघाचे गेले दोन सामने पावसामुळे रद्द झाले आहेत त्यामुळे त्या संघातील खेळाडू प्रत्यक्ष मैदानावर उतरून कामगिरी करण्यास उत्सुक असतील. जर रायगड विरुद्ध विजय मिळवला तर नाशिकचे प्लेऑफ मधील स्थान पक्के होईल, तर रायगडसाठी परिस्थिती बिकट होईल, त्यामुळे प्लेऑफच्या शर्यतीच्या दृष्टिकोनातून ह्या सामन्याला अनन्यसाधारण महत्त्व असेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Up