aappansare.in

Social

पुणे वि. नाशिक: एमपीएलमध्ये अव्वल दोन संघांमध्ये लढत

Share

पुणे, १४ जून २०२५: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रिमियर लीग (एमपीएल) स्पर्धेत उद्या (दि. १५ जून रोजी) ४एस पुणेरी बाप्पा संघासमोर ईगल नाशिक टायटन्स संघाचे आव्हान असेल.

दि. १४ जून रोजी झालेल्या सामन्यात पुणेरी बाप्पाने पीबीजी कोल्हापूर टस्कर्सवर पाच गडी राखून थरारक विजय मिळवला होता. तर दुसऱ्या हाताला, शुक्रवारच्या सामन्यात ईगल नाशिक टायटन्सने सातारा वॉरियर्स संघाला पराभूत केलं होतं. नाशिकचा संघ स्पर्धेत सहा सामन्यात १० गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे तर पुण्याचा संघ सात सामन्यात ९ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

शनिवारच्या सामन्यात अद्वय सिधये (५८, ३६ चेंडू, ५ षटकार) व रामकृष्ण घोष (५०, २३ चेंडू, १ चौकार, ५ षटकार) यांनी १०१ धावांची भागीदारी करत पुण्याला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे, पुण्याच्या संघाचा आत्मविश्वास नक्कीच द्विगुणित झाला असेल.

रविवारच्या दुसऱ्या सामन्यात रत्नागिरी जेट्सचा सामना सातारा वॉरियर्स संघासोबत होईल. रत्नागिरीचा अखेरच्या साखळी सामना पावसामुळे रद्द झाला होता तर सातारा वॉरियर्स संघाला नाशिक विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे जर सामन्यात पावसाचा व्यत्यय आला नाही तर दोन्ही संघ दोन गुण मिळवण्यासाठी उत्सुक असतील.

सुरुवातीचे तीन सामने सलग गमावल्यानंतर रत्नागिरीच्या संघाने सातारा वॉरियर्स विरुद्ध विजय मिळवून त्यांचं स्पर्धेतील खातं उघडलं होतं.
त्यामुळे रत्नागिरीचा कर्णधार अझीम काझीला साताऱ्याविरुद्ध संघ आधीच्या निकालाची पुनरावृत्ती करेल अशी अपेक्षा असेल. दुसऱ्या हाताला, सातारा संघाने आत्तापर्यंत केवळ एक विजय मिळवला आहे.

रविवारच्या तिसऱ्या सामन्यात पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाचा सामना रायगड रॉयल्स संघाशी होईल. कोल्हापूरला त्यांच्या अखेरच्या सामन्यात पुणेरी बाप्पाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. तर त्यांच्या अखेरच्या सामन्यात रायगड रॉयल्सने पुणेरी बाप्पाला पाणी पाजलं होतं.

आत्तापर्यंत राहुल त्रिपाठीच्या कोल्हापूर संघाला स्पर्धेत केवळ एक विजय मिळवता आला आहे, तर रायगडच्या संघाने आत्तापर्यंत तीन विजय मिळवले आहेत. साखळी फेरीतून पुढे जाण्यासाठी दोन्ही संघाना ह्या सामन्यात विजय आवश्यक आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Up