अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत ईगल नाशिक टायटन्स पुन्हा विजयीपथावर
Share
प्रशांत सोळंकी(४-१९)ची सुरेख गोलंदाजी

पुणे, १३ जून २०२५: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) 2025 स्पर्धेत १३व्या लढतीत फिरकीपटू प्रशांत सोळंकी(४-१९) च्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर ईगल नाशिक टायटन्स संघाने सातारा वॉरियर्स संघाचा ३ गडी राखून पराभव करत विजयीपथावर पुनरागमन केले.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत ईगल नाशिक टायटन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामवीर ओम भोसले १५ धावा काढून बाद झाला. पवन शहाने २४चेंडूत ३चौकार लगावत २३धावा केल्या, तर हर्षल काटेने १७चेंडूत ४चौकाराच्या मदतीने २५धावा केल्या. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ३६ चेंडूत ४५ धावांची भागीदारी करून संघाची धावगती वाढवली. हे दोघेही बाद झाल्यावर अनिकेत पोरवालने २५चेंडूत २६धावांची सयंमी खेळी केली. त्यात त्याने १चौकार व १ षटकार खेचले. पण त्याला रोहन दामलेने झेल बाद केले. त्यानंतर मधल्या व तळातील फलंदाज मेहुल पटेल(२), सौरभ नवले(२), शामसुझमा काझी(३), राजवर्धन हंगरगेकर(१), वैभव चौघुले(११) शुभम मेड(१) हे सपशेल अपयशी ठरल्यामुळे सातारा वॉरियर्स संघाचा डाव ११५धावांवर संपुष्टात आला. ईगल नाशिक टायटन्सकडून फिरकीपटू प्रशांत सोळंकी यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने १९धावात ४ बळी घेतले. त्याला रोहन दामले(२-२१), मुकेश चौधरी(२-३२) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून साथ दिली.
ईगल नाशिक टायटन्स संघाला विजयासाठी ११५ धावांचे आव्हान होते. ईगल नाशिक टायटन्सची डावाची सुरुवात खराब झाली. अर्शिन कुलकर्णी(०)खाते न उघडताच तंबूत परतला. मंदार भंडारीने २२चेंडूत ३चौकार मारत २२धावा काढल्या. साहिल पारख ६ धावांवर बाद झाला. आघाडीचे तीनही फलंदाज बाद झाल्यानंतर सिद्धांत दोशी २१, रणजीत निकम नाबाद १८, रोहन दामले १४, अथर्व काळे १३ यांनी धावा काढून संघाला १६.५ षटकात ७ बाद ११८ धावा काढून हे आव्हान पूर्ण करून दिले. सातारा वॉरियर्सकडून विवेक शेलार(२-३३), राजवर्धन हंगरगेकर(२-३८) यांनी सुरेख गोलंदाजी केली.
संक्षिप्त धावफलक
सातारा वॉरियर्स: १९.५ षटकात सर्वबाद ११५धावा(अनिकेत पोरवाल २६(२५,१x४,१x६), हर्षल काटे २५, पवन शहा २३,ओम भोसले १२, वैभव चौघुले ११, प्रशांत सोळंकी ४-१९, रोहन दामले २-२१, मुकेश चौधरी २-३२, अक्षय वैकर १-१२) पराभुत वि.ईगल नाशिक टायटन्स: १६.५ षटकात ७बाद ११८धावा(मंदार भंडारी २२, सिद्धांत दोशी २१, रणजीत निकम नाबाद १८, रोहन दामले १४, अथर्व काळे १३, विवेक शेलार २-३३, राजवर्धन हंगरगेकर २-३८, वैभव दारकुंडे १-१८) सामनावीर – प्रशांत सोळंकी.