अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत रायगड रॉयल्सचा शेवट गोड
Share
पुणे, १२ जून २०२५: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग(डब्लूएमपीएल) 2025 स्पर्धेत आठव्या दिवशी अखेरच्या औपचारिक साखळी फेरीच्या लढतीत किरण नवगिरे (३७धावा व १-१६) हिने केलेल्या अष्टपैलु खेळीच्या जोरावर रायगड रॉयल्स संघाने रत्नागिरी जेट्स संघाचा १७ धावांनी पराभव करून आपला शेवट गोड केला.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत रत्नागिरी जेट्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रत्नागिरी जेट्सच्या भेदक माऱ्यापुढे रायगड रॉयल्सचा डाव गडगडला. त्यांचा डाव १९.४ षटकात सर्वबाद १०६धावावर संपुष्टात आला. यात कर्णधार किरण नवगिरेने २० चेंडूत सर्वाधिक ३७ धावांची खेळी केली. तिने ४चौकार व २षटकार खेचले. किरणला प्रियांका घोडकेने झेल बाद करून संघाला पहिला धक्का दिला. त्यानंतर आदिती गायकवाड २३, भाविका आहिरे १९, मिहिका दिंगणकर १० यांनी धावा केल्या. रत्नागिरी जेट्सकडून फिरकीपटू प्रियांका घोडके यशस्वी गोलंदाज ठरली. तिने १० धावा ५ बळी घेतले. याबरोबरच प्रियांकाने या स्पर्धेत एकाच सामन्यात सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम केले. याआधी चिन्मयी बोरफळेने रायगड रॉयल्स विरुद्ध ४ गडी टिपले होते. प्रियांकाला अनुश्री स्वामी(२-१०), भक्ती मिरजकर(२-१५) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून साथ दिली.
हे आव्हान रत्नागिरी जेट्स संघ पेलू शकला नाही. त्यांचा डाव २०षटकात ९बाद ८९धावाच करू शकला. यात रसिक शिंदे २९, गौतमी नाईक २२ यांनी केलेल्या धावा वगळता एकही फलंदाज दुहेरी खेळी करू शकला नाही. रायगड रॉयल्सकडून इशा पठारेने १४ धावात २ गडी, तर यशोदा घोगरे(१-१३), किरण नवगिरे(१-१६) यांनी प्रत्येकी एक गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिला. सामन्याची मानकरी प्रियांका घोडके ठरली.

एमसीएचे ऍपेक्स समितीचे सदस्य केशव वझे यांच्या हस्ते सामनावीर पुरस्कार स्वीकारताना प्रियांका घोडके
संक्षिप्त धावफलक
रायगड रॉयल्स: १९.४ षटकात सर्वबाद १०६धावा(किरण नवगिरे ३७(२०,४x४,२x६), आदिती गायकवाड २३, भाविका आहिरे १९, मिहिका दिंगणकर १०, प्रियांका घोडके ५-१०, अनुश्री स्वामी २-१०, भक्ती मिरजकर २-१५) वि. रत्नागिरी जेट्स: २०षटकात ९बाद ८९धावा(रसिक शिंदे २९, गौतमी नाईक २२, इशा पठारे २-१४, यशोदा घोगरे १-१३, किरण नवगिरे १-१६); सामनावीर – प्रियांका घोडके.