aappansare.in

Social

1008 तास संवादिनी सराव वादनाची संकल्पपूर्ती

Share


गांधर्व महाविद्यालय, पुणेचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे यांचा उपक्रम
पुणे : कला आणि ज्ञानाच्या क्षेत्रात सरावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे जाणून गांधर्व महाविद्यालय, पुणेचे प्राचार्य, ज्येष्ठ संवादिनी वादक पंडित प्रमोद मराठे यांच्या संकल्पनेतून ‌‘रामनवमी सराव‌’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गुढीपाडवा ते हनुमान जयंती या कालावधीत गुरुंसह शिष्यांनी 1008 तास संवादिनी सराव वादन संकल्पाची पूर्तता केली.
14 दिवसांच्या या कालावधीत दररोज 18 तास संवादिनी सराव वादन करण्यात आले. उपक्रमात 7 ते 70 या वयोगटातील 60 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक तासात चार ते पाच विद्यार्थी सामूहिक संवादिनी सराव वादन करत होते. विद्यार्थ्यांनी विविध राग, पलटे यांचा सराव केला. वादनात एकसुरीपणा येऊ नये यासाठी दर अर्ध्या तासाने पलटा बददला जात होता.
विद्यार्थ्यांमध्ये सराव करण्याची इच्छा आणि गोडी निर्माण व्हावी याकरिता हा संकल्प केला असल्याचे पंडित प्रमोद मराठे म्हणाले. 1983 सालापासून सामूहिक संवादिनी सराव वादनाचा उपक्रम सुरू असून सुरुवातीस फक्त राम नवमीच्या दिवशी 6 किंवा 12 तास सराव वादन केले जात असे. सुमारे 25 वर्षांपूर्वी विद्यार्थी संख्या वाढत गेल्यानंतर हे सराववादन 24 तास केले जात असे. 6 वर्षांपूर्वीपासून गुढीपाडवा ते रामनवमी या कालावधीत सकाळी 6 ते रात्री 9 असे सलग 15 तास सराव वादन करून 108 तासांचा टप्पा गाठला गेला. 1008 तास सामूहिक सराव वादन करण्याचे हे पहिलेच वर्ष आहे, असेही त्यांनी सांगितले.
या उपक्रमात कर्नाटकमधील यल्लापूर जवळील लहानशा गावातून आलेल्या सविता हेगडे या गुरुकुलातील विद्यार्थिनीने 108 तास सराव केला तसेच मयुरेश गाडगीळ या गुरुकुलातीलच अंध विद्यार्थ्याने 108 तास सरावाची संकल्पपूर्ती केली. पुण्याबाहेरीलही काही विद्यार्थी या कालावधीत महाविद्यालयात येऊन सरावात सामिल झाले होते. सराव वादन उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना उपप्राचार्या परिणिता मराठे यांचेही मार्गदर्शन लाभले.

‌‘रामनवमी सराव‌’ उपक्रमात प्राचार्य पंडित प्रमोद मराठे आणि उपप्राचार्या परिणिता मराठे यांच्यासह संवादिनी वादन करताना विद्यार्थी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Up