aappansare.in

Social

पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याची मागणी

Share

पुणे, दि. 22 – पुणे रेल्वे स्थानकाला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे तसेच शनिवारवाड्याचे गतवैभव पुन्हा मिळवून देण्याच्यादृष्टीने केंद्र सरकार आणि राज्य सरकारने विशेष प्रयत्न करायला हवेत, अशी एकमुखी मागणी आज शनिवारवाड्याच्या 293 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने खासदार प्रा. मेधा कुलकर्णी, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि आमदार हेमंत रासने यांच्या समोर करण्यात आली, ज्याला सकारात्मक प्रतिसाद देत ही मागणी केंद्र सरकारपर्यंत घेऊन जाण्याचे आश्‍वासन उभयतांनी यावेळी दिले. आजच्या कार्यक्रमात इतिहासतज्ञ व लेखक उदय कुलकर्णी यांचा विशेष सत्कार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारवाड्यावर घेण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रतिष्ठानचे सरचिटणीस कुंदनकुमार साठे यांनी सर्वांचे स्वागत करुन ही मागणी जाहीरपणे मांडली. पुणे शहराची ओळख शनिवारवाड्याच्या महापराक्रमी बाजीराव पेशव्यांच्या इतिहासाची आहे. पुणे विमानतळाला जगदगुरु संत तुकाराम महाराजांचे नाव देण्यात येणार आहे, त्या पार्श्‍वभूमीवर बाजीराव पेशव्यांच्या इतिहासाचे स्मरण व्हावे आणि सर्वांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने पुणे रेल्वे स्थानकाला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देणे उचित होईल अशी मागणी पेशवे प्रतिष्ठानचे कुंदनकुमार साठे, अनिल गानू, श्रीकांत नगरकर, चिंतामणी क्षीरसागर यांच्याबरोबरीने देवदेवेश्‍वर संस्थानचे विश्‍वस्त सुधीर पंडीत, रमेश भागवत, सकल ब्राह्मण समाजाचे समन्वयक भालचंद्र कुलकर्णी, सचिन बोधनी, पुणे सार्वजनिक सभेचे नारगोळकर, भारत इतिहास संशोधक मंडळाचे पांडुरंग बलकवडे, सावरकर जयंती महोत्सवाचे प्रमुख सूर्यकांत पाठक तसेच पेशव्यांचे वंशज पुष्करसिंह पेशवा आदींनी याप्रसंगी केली. यावेळी जगन्नाथ लडकत यांनी शनिवारवाड्याच्या वैभवशाली इतिहासाची आणि बाजीराव पेशव्यांच्या पराक्रमाची माहिती उपस्थितांना दिली.

यावेळी बोलतांना चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, शनिवारवाड्याचे गतवैभव पुन्हा नागरिकांना दिसले पाहिजे, यादृष्टीने एक चांगला प्रकल्प अहवाल तयार करावा आणि त्यासाठी राज्य शासनाच्या वतीने पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. खासदार कुलकर्णी म्हणाल्या की, पुण्याचा इतिहास सर्व जगाला समजला पाहिजे, पुण्याची ओळख शनिवारवाडा आहे, त्यासाठी सर्व स्तरावरुन प्रयत्न करुन शनिवारवाड्याचे गतवैभव पुन्हा मिळवून दिले पाहिजे. पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने रेल्वेमंत्री आश्‍विनी वैष्णव यांना निवेदन देवून पुणे रेल्वे स्थानकाला बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Up