समर्थ भारताच्या निकषांवरील खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन
Share
पुणे, दि. 25 मार्च – आदर्श व समर्थ भारताचे निकष काय असावेत? या विषयावर सर्व स्तरातील नागरिकांसाठी खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन भांडारकर संस्था आणि कौशलम न्यास यांच्या वतीने करण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन आणि या उपक्रमाच्या प्रमुख लीना मेहेंदळे यांनी आज येथे दिली.
यावेळी अधिक माहिती देतांना मेहेंदळे यांनी सांगितले की, आज भारताच्या विकासाची चर्चा सर्व जगभर सुरु आहे. विकसित राष्ट्र होण्याकडे भारताचा प्रवास सुरु असतांना आपला देश आदर्श आणि समर्थ देखील झाला पाहिजे व हा भारतीयांच्या प्रयत्नाशिवाय होऊ शकत नाही. त्यादृष्टीने 2047 पर्यंतच्या वाटचालीचे नियोजन, संकल्प व खास करून आपले निकष काय असतील, याची चर्चा सुरू झाली पाहिजे. देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होत असतांनाचे चित्रण आपण कोणत्या निकषातून करणार आहोत याचे मंथन या निबंध स्पर्धेमधून दिसावे अशी यामागची भावना आहे.
मराठी, हिंदी, गुजराथी, तेलुगु आणि कोकणी अशा 5 भाषांमध्ये होत असलेल्या या निबंध स्पर्धेसाठी सर्वसमान्य नागरिकांनी 3 हजार शब्दात, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी 2 हजार पाचशे शब्दात आणि शालेय विद्यार्थ्यांनी बाराशे शब्दात निबंध लिहायचा आहे. या स्पर्धेकरिता दि. 15 मे 2025 पर्यंत फेसबुक ग्रुपच्या या लिंकवरhttps://www.facebook.com/groups/511254721726919 जाऊन
निःशुल्क नोंदणी करता येणार असून प्रत्यक्षात निबंध 31 जुलै 2025 पर्यंत सादर करायचा आहे. डिजीटल पध्दतीने निबंध सादर करावयाचा असून यासंबंधीची विस्तृत नियमावली नोंदणी झाल्यानंतर संबंधितांना मिऴणार आहे. विजेत्यांना भरघोस बक्षिसे दिली जाणार असून यशस्वी निवडक निबंधांचे पुस्तक देखील प्रसिध्द केले जाणार आहे. या अनुषंगाने गटचर्चा घेण्याचेही आयोजन आहे.
यावेळी पटवर्धन यांनी भांडारकर संस्था विविध विषयांवरचे डिजीटल कोर्सेस मोठ्या प्रमाणावर आयोजित करत असल्याची देखील माहिती दिली.
