aappansare.in

Social

संगीत क्षेत्रात आज करिअरच्या मुबलक संधी उपलब्ध

Share


पुणे – संगीत क्षेत्रात आज मोठ्या प्रमाणात व्यवसायाच्या दृष्टीने संधी उपलब्ध आहेत ज्यात दिग्दर्शन, संयोजन, रेकॉर्डिस्ट, थेरपिस्ट, संशोधक अशा अनेक वाटा खुल्या आहेत. पूर्वी या क्षेत्रात संधींची उपलब्धता कमी होती. पुणे-मुंबईसारख्या शहरांमध्ये आता मुबलक संधी उपलब्ध आहेत. विद्यापीठीय अभ्यासक्रम तसेच विविध माध्यमातून विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन घडत आहे. विद्यार्थ्यांनी करिअरचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. नोकरी म्हणजे करिअर नाही हे समजून संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकासाचे शिक्षण घ्यावे, असा सल्ला संगीत तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना दिला.
संवाद, पुणे, हाऊस ऑफ सक्सेस, भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌‍, पुणे मॅनेजमेंट असोसिएशन आणि पुणे विद्यार्थी गृह यांच्या संयुक्त विद्यमाने ‌‘नेक्स्ट जेन करिअर फेस्ट‌’ या उपक्रमाअंतर्गत आज (दि. 14) बालगंधर्व कलादालनात भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌‍तर्फे ‌‘भारतीय संगीतकलेच्या क्षेत्रात करियर करताना‌’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक डॉ. विकास कशाळकर, सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार, प्रसिद्ध बासरीवादक पंडित राजेंद्र कुलकर्णी यांनी मते नोंदविली.
डॉ. विकास कशाळकर यांनी संगीत शिक्षणाव्यतिरिक्त करिअरसाठी पूरक वाटा उपलब्ध असल्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. यात साहित्य, संगीतविषयक लेखन करणारे विश्लेषक, मार्गदर्शक, प्रकाशक, संयोजक अशा विविध कार्यक्षेत्रांविषयी सखोल मार्गदर्शन केले.
कौशल इनामदार म्हणाले, कलेत करिअर करणे म्हणजे इतरांशी स्पर्धा नसून कलाकाराने आपआपला ध्रुवतारा शोधणे आहे. इतर क्षेत्रात काम करताना येणारा तोच-तोपणा कलाकार नक्कीच टाळू शकतो. कारण कलाकाराला आज केलेले काम उद्या करता येत नाही तर चौकटीबाहेर जाऊन विचार करणे भाग असते. कलाकाराने स्वत:च्या कंफर्ट झोनमधून बाहेर पडत करिअर करणे आवश्यक आहे. शिकलेली कोणतीही गोष्ट वाया जात नाही हे लक्षात घेऊन संगीत कलाकाराने साहित्य, चित्र, शिल्प, नृत्य आदी कलांचाही विचार करावा. अभिजात कला ही खोलवर जाऊन काम करते तर उपयोजित कलेचे क्षेत्र नेहमी विस्तारित असते, असेही ते म्हणाले.
कलाकार म्हणून कसा घडलो याविषयी पंडित राजेंद्र कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.

चर्चासत्रात बोलताना डॉ. विकास कशाळकर. समवेत कौशल इनामदार, पंडित राजेंद्र कुलकर्णी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Up