aappansare.in

Social

श्रीकृष्ण संगीत महोत्सवात सुषीर वाद्यांच्या त्रिवेणी संगमात रसिक रममाण

Share


पंडित प्रमोद गायकवाड यांच्या एकसष्टीपूर्तीनिमित्त विशेष सत्कार
गांधर्व महाविद्यालय, पुणे आणि स्वर ताल अकॅडमीतर्फे आयोजन
पुणे : गांधर्व महाविद्यालय, पुणे आणि स्वर ताल म्युझिक अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी आयोजित श्रीकृष्ण संगीत महोत्सवात गायन-वादनाची सुरेल मैफल अनुभवायला मिळाली. शहनाई, बासरी आणि संवादिनी या सुषीर वाद्यांच्या त्रिवेणी संगमात रसिक रममाण झाले.
संगीत साधक, गुरू डॉ. पंडित प्रमोद गायकवाड यांच्या एकसष्ठीपूर्ती निमित्ताने गांधर्व महाविद्यालयातील विष्णू विनायक स्वरमंदिरात संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पंडित गायकवाड यांचा डॉ. विकास कशाळकर यांच्या हस्ते या वेळी विशेष सन्मान करण्यात आला. पंडित प्रमोद मराठे, पंडित राजेंद्र कुलकर्णी, पंडित रामदास पळसुले, विदुषी सानिया पाटणकर, डॉ. शुभांगी बहुलीकर, विनायक गुरव, संतोष घंटे, पंडित सुरेश पतकी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वर ताल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांच्या तबला सहवादनाने झाली. ताल तीनतालमध्ये पेशकार, कायदे, रेले, तोडे-तुकडे सादर केले. विद्यार्थ्यांना मयुरेश गाडगीळ याने लहेरा साथ केली. विदुषी सानिया पाटणकर यांनी आपल्या गायन मैफलीची सुरुवात राग बसंत केदारमधील विलंबित तीनतालात ‌‘अतर सुगंध‌’ या पारंपरिक बंदिशीने केली. यानंतर मोगुबाई कुर्डिकर यांची द्रुत एकतालातील ‌‘खेल न आयी नवेली नार‌’ ही बंदिश सादर केली. बसंत रागातील सरगमने त्यांनी मैफलीची सांगता केली. सुरेल आवाज, दमदार ताना, आवाजाची फिरत या वैशिष्ट्यांनी मैफल रंगली. विनायक गुरव (तबला), संतोष घंटे (संवादिनी), वेदवती परांजपे, प्रशिका सहारे (सहगायन) यांनी साथसंगत केली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पंडित राजेंद्र कुलकर्णी (बासरी), पंडित प्रमोद मराठे (संवादिनी) आणि डॉ. प्रमोद गायकवाड (शहनाई) यांच्या सहभागातून सुषीर वाद्यांचा संगम साधला गेला. या दिग्गज कलाकारांना आपल्या वादन मैफलीची सुरुवात राग मारुबिहागने केली. पंडित डॉक्टर प्रमोद गायकवाड यांच्या शहनाईचे सुमधुर स्वर, पंडित प्रमोद मराठे यांच्या संवादिनीचे सुरेल वादन तर पंडित राजेंद्र कुलकर्णी यांच्या बासरीचे आसमंतात भरून राहणारे सूर यांनी मैफलीत रंगत आणली. बनारसी धुन ऐकविल्यानंतर कलाकारांनी मैफलीची सांगता भैरवीतील धुन ऐकवून केली. या सर्व दिग्गज कलाकारांना जगविख्यात तबलावादक पंडित रामदास पळसुले यांच्या तबल्याची अजोड साथ लाभल्याने ही वादन मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. उपस्थित कलाकार, संगीत प्रेमी रसिकांसाठी ही अनोखी मैफल हृदयात जपून ठेवण्यासाठी अनमोल ठरली. कलाकारांचा सत्कार डॉ. विकास कशाळकर यांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी बोलताना डॉ. कशाळकर म्हणाले, डॉ. प्रमोद गायकवाड हे उत्तम गायक असून कलाकारात आवश्यक व्यापकता आणि मनाचा मोठापणा त्यांच्याकडे भरभरून आहे. सहकलाकारांना सामावून घेत मैफलीत रंग भरणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांनी शहनाई या वाद्याचे शास्त्रोक्त संशोधन करून संगीत जगताला मोठी देणगी दिली आहे.
सत्काराला उत्तर देताना डॉ. प्रमोद गायकवाड म्हणाले, मी आजपर्यंत सांगीतिक क्षेत्रात केलेल्या कामाचे गुरूंकडून कौतुक होत आहे. या पवीत्र वास्तूत माझा सन्मान होत आहे, हा माझ्यासाठी सुवर्णक्षणच आहे. डॉ. शुभांगी बहुलकीकर यांनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन अबोली सेवेकर यांनी केले तर आभार विनायक गुरव यांनी मानले.

वाद्यांच्या त्रिवेणी संगमात सहभागी पंडित राजेंद्र कुलकर्णी, पंडित प्रमोद मराठे आणि डॉ. प्रमोद गायकवाड. तबलासाथ करताना पंडित रामदास पळसुले.

संगीत साधक, गुरू डॉ. पंडित प्रमोद गायकवाड यांचा एकसष्ठीपूर्ती निमित्ताने सत्कार करताना डॉ. विकास कशाळकर आणि मान्यवर.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Up