aappansare.in

Social

शिक्षक, पालकांनी ‌‘बालकारणी‌’ व्हावे : प्रसाद वनारसे

Share

महाराष्ट्रीय कलोपासक, नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित भालबा केळकर नाटिका स्पर्धेचे पारितोषिक वितरण

‌‘अरररर्र.. घुमतयं कोण.. गोळवकलरशिवाय आहेच कोण?‌’ भालबा केळकर करंडक पटकाविणाऱ्या मुलांचा एकच नारा

OLYMPUS DIGITAL CAMERA

महाराष्ट्रीय कलोपासक आणि नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित भालबा केळकर नाटिका स्पर्धेत भालबा केळकर करंडक स्वीकारताना मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयाचा (टिळक रोड) संघ. समवेत प्रसाद वनारसे, अनंत निघोजकर, राजू बावडेकर, केतकी पंडित, अनिरुद्ध दिंडोरकर.

पुणे : अभिनय करताना प्रत्येक कलाकाराला त्यातून आनंद घेता आला पाहिजे. नाटक सादर करताना संघभावना वाढण्याबरोबरच एकत्र काम करणे, एकमेकांना समजून घेणे जमायला लागते. यासाठी नाटककला जोपासली गेली पाहिजे. पालक आणि शिक्षकांनी लहान मुलांसाठी काम करताना मुलांच्या दृष्टीकोनातून, भिंगातून पाहत ‌‘बालकारणी‌’ होणे गरजेचे आहे, असे मत इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष प्रसाद वनारसे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्रीय कलोपासक आणि नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित भालबा केळकर नाटिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज (दि. 16) वनारसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्रीय कलोपासकचे अध्यक्ष अनंत निघोजकर, परीक्षक अनिरुद्ध दिंडोरकर, राजू बावडेकर, केतकी पंडित रंगमंचावर होते. भरत नाट्य मंदिर येथे पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीस ‌‘कथा आमच्या शिक्षणाची‌’ (मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालय, टिळक रोड), ‌‘माझा बाप्पा‌’ (कला केंद्र, पुणे), ‌‘व्हाईट वॉश‌’ (आर्यन्स वर्ल्ड स्कूल, वारजे), ‌‘जीवन त्यांना कळले हो!‌’ (नवीन मराठी शाळा, पुणे) या नाटिकांचे सादरीकरण झाले. स्पर्धेचे यंदाचे 32वे वर्ष आहे.

ताराबाई मोडक यांच्या ‌‘बालकारणी‌’ या उक्तीचा सविस्तर अर्थ सांगून वनारसे पुढे म्हणाले, मुलांनी कुठचीही कला, छंद जोपासताना त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन विकसित करणे गरजेचे आहे. नाटकात भाग घेतल्यानंतर स्पर्धा संपली तरीही नाटक संपू नये. सतत नाटकाजवळ रहावे. नाटकातून लहानांचा व्यक्तीमत्त्व विकास साधण्यासाठी मोठ्यांनी प्रयत्नशील रहावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

परीक्षकांच्या वतीने बोलताना अनिरुद्ध दिंडोकर म्हणाले, स्पर्धा बघताना बालनाट्यातील कलाकारांकडून आम्हीही खूप काही शिकलो. त्यांनी दिलेली उर्जा आम्हाला खूप काळ उपयोगास येईल. मुले कुठलीही गोष्ट चटकत आत्मसात करतात, आपण सांगू तसे करतात. स्पर्धेत नाटक करताना मुलांना सरावासाठी पुरेसा वेळ देणे, मराठी भाषा बोलण्याचा सराव करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण शब्द न समजल्यास त्याचा भाव पोहोचवता येत नाही. आजच्या काळात मुलांनच्या भावविश्वाचा परीघ विस्तारल्याने नाटकाच्या विषयाची निवड करताना त्यात वैविध्य असणे गरजेचे आहे. नाटकाचे परीक्षण करताना कलाकारांच्या संघभावनेला महत्त्व दिले.

परीक्षकांच्या वतीने मानव्य संस्थेस मदत देण्यात आली. मान्यवरांचे स्वागत अनंत निघोजकर यांनी केले. सूत्रसंचालन अवंती लोहकरे यांनी केले तर आभार अभिजित देशपांडे यांनी मानले. निकालाचे वाचन ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी केले.

मुलांचा जल्लोष

पारितोषिकासाठी नावे जाहीर झाल्यानंतर मुलांनी एकच जल्लोष केला. ‌‘अरे, आव्वाज कुणाचा.. गोळवलकर शाळेचा‌’, ‌‘करंडक कुणाचा.. गोळवलकर शाळेचा‌’, ‌‘अरररर्र.. घुमतयं कोण.. गोळवकलरशिवाय आहेच कोण?‌’, ‌‘आवाज कुणाचा कला केंद्राचा‌’, हिप हिप हुर्रे‌’ असे नारे देत मुलांनी नाट्यगृह दणाणून सोडले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Up