aappansare.in

Social

शहरे संकुचित करत उपनगरे स्वयंपूर्ण व्हावीत : अरुण फिरोदियापर्यावरणास घातक वस्तूंवर जबर कर लावावा : अरुण फिरोदियादिलीपराज प्रकाशन प्रकाशित, दीपक शिकारपूर लिखित ‌‘पर्यावरण संरक्षणासाठी आधुनिक स्मार्ट तंत्रज्ञान‌’ या 60व्या पुस्तकाचे प्रकाशन

Share

पुणे : पुण्याची ओळख फॅनलेस शहर अशी होती. पण आपणच आपले चोचले वाढवून पर्यावरणाचा ऱ्हास करीत चाललो आहोत. आपल्या पूर्वजांनी पर्यावरण रक्षणासाठी अनेक प्रयोग केले ते यशस्वीही झाले. शहरे संकुचित करत उपनगरे स्वयंपूर्ण करावीत, कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील राहावे, उर्जा बचत आणि संसाधनांचा पुनर्वापर व्हावा, अशी अपेक्षा कायनेटिक उद्योग समूहाचे अध्यक्ष पद्मश्री अरुण फिरोदिया यांनी व्यक्त केली. पर्यावरणास घातक असणाऱ्या वस्तूंवर सरकारने जास्तीत जास्त कर लावावा तर पर्यावरणपूरक वस्तूंवरील कर कमी करावा, अशी सूचना त्यांनी सरकारला केली.

दिलीपराज प्रकाशनतर्फे ‌‘पर्यावरण संरक्षणासाठी आधुनिक स्मार्ट तंत्रज्ञान‌’ या दीपक शिकारपूर लिखित पुस्तकाचे प्रकाशन आज (दि. 30) कायनेटिक उद्योग समूहाचे अध्यक्ष पद्मश्री अरुण फिरोदिया, प्रसिद्ध समाजसेविका व उद्योजिका पद्मश्री लीला पुनावाला, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्या वेळी फिरोदिया बोलत होते. दिलीपराज प्रकाशनचे संचालक मधुर बर्वे मंचावर होते. दीपक शिकारपूर यांचे हे 60 वे पुस्तक असून त्यांच्या 60व्या वाढदिवसाचे निमित्त साधून पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन नवलमल फिरोदिया सभागृह, भांडारकर इन्स्टिट्यूट येथे करण्यात आले होते.

पूर्वीच्याकाळी पुन:प्रक्रिया, पुनर्वापर या माध्यमातून उर्जेचा कमीत कमी वापर करून नैसर्गिक स्रोतांची जपणूक केली जात असे, या विषयीची काही उदाहरणे देऊन पद्मश्री अरुण फिरोदिया पुढे म्हणाले, घरांघरांमध्ये पाण्याचा पुनर्वापर व्हावा, शहराला हिरवेगार करण्यासाठी मोठमोठ्या इमारतींवर वेली चढवाव्यात, बांबूचा मोठ्या प्रमाणात वापर व्हावा, त्याचप्रमाणे नागरिकांनी आपल्या निवासस्थानाजवळील शाळा, रुग्णालये, नोकरीच्या जागा यांचा लाभ घेऊन प्रवास कमी करण्यावर भर द्यावा, ज्यायोग प्रदुषणाला आळा बसेल. ते पुढे म्हणाले, इलेक्ट्रिक वाहने वापरण्यास हरकत नाही परंतु प्रत्येकाने पायी चालण्यावर भर द्यावा, ज्यायोगे उर्जेची फक्त बचतच होणार नाही तर नागरिकांचे आरोग्यही उत्तम राहिल. औद्योगिक आस्थापनांनी उद्योगक्षेत्राच्या परिसरात कर्मचाऱ्यांचे निवासस्थान, मुलांसाठी शाळा, रुग्णालये, मनोरंजानाची माध्यमे यांची सोय करून दिल्यास उपनगरेही स्वयंपूर्ण होतील.

पद्मश्री लीला पुनावाला म्हणाल्या, ‌‘पर्यावरण संरक्षणासाठी आधुनिक स्मार्ट तंत्रज्ञान‌’ या पुस्तकाचे इंग्रजी भाषेत भाषांतर झाल्यास जागतिक पातळीवर या विषयी प्रचार व प्रसार होईल आणि पर्यावरणविषयक जागतिक समस्येवर विचारमंथन होईल.

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, दीपक शिकारपूर यांचे पुस्तक ज्ञानलक्षी साहित्यदालनात लक्षणीय भर घालणारे आहे. भारतीय संस्कृतीत तसेच संतसाहित्यातही निसर्गाचे संवर्धन याविषयी गांभीर्याने विचार केलेला दिसून येतो. आज जगासमोर झपाट्याने बदलत जाणाऱ्या तंत्रज्ञानासह इंधन, प्रदुषण, तापमानवाढ अशी अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. अशा सामाजिक परिस्थितीत दीपक शिकारपूर यांनी केलेले सूत्रबद्ध नेमकेपणा व नेटकेपणा जपणारे हे पुस्तक समाजासाठी दिशादर्शक ठरेल. या पुस्तकाचे इंग्रजीसह सर्व भारतीय भाषांमध्येही भाषांतर व्हावे.

पुस्तक लेखनविषयी बोलताना दीपक शिकारपूर म्हणाले, पर्यावरणाचे रक्षण करताना या पुस्तकात दिलेले अनेक उपाय हे साधे-सोपे व सरळ आहेत. आपल्या रोजच्या जीवनात आपण यांचा अवलंब केल्यास उर्जासंवर्धन तसेच खर्चात बचत होईल. 2025 नंतर एन्व्हॉर्यनमेंटल सोशल गर्व्हनन्स या क्षेत्राचा मोठा बोलबाला होणार असून पर्यावरण क्षेत्रात नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, या करीता युवा पिढीने सजग राहणे आवश्यक आहे.

प्रास्ताविकात मधुर बर्वे म्हणाले, दिलीपराज प्रकाशनतर्फे प्रकाशित होणारे हे 2930वे पुस्तक आहे.

‌‘पर्यावरण संरक्षणासाठी आधुनिक स्मार्ट तंत्रज्ञान‌’ या ब्रेल लिपितील पुस्तकाचे प्रकाशन या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते झाले. हे पुस्तक नॅशनल फेडरेशन फॉर ब्लाईंडचे नारायण काकडे यांनी ब्रेल लिपित आणले आहे.

मान्यवरांचे स्वागत दिलीपराज प्रकाशनचे संचालक राजीव बर्वे व मधुमिता बर्वे यांनी केले. सूत्रसंचालन मधुर बर्वे यांनी केले तर आभार मधुमिता बर्वे यांनी मानले.

दिलीपराज प्रकाशनतर्फे प्रकाशित ‌‘पर्यावरण संरक्षणासाठी आधुनिक स्मार्ट तंत्रज्ञान‌’ पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी उपस्थित (डावीकडून) मधुर बर्वे, प्रा. मिलिंद जोशी, लीला पुनावाला, अरुण फिरोदिया, दीपक शिकारपूर.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Up