aappansare.in

Social

विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा गौरव… ‘झेप’ उपक्रमाचा समारोप प्रेरणादायी वातावरणात संपन्न !

Share

पुणे : पद्मश्री महर्षी डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ (माई) संस्थापित ‘सप्तसिंधू’ महिला आधार, बालसंगोपन व शिक्षण संस्था, संचलित ‘सन्मती बाल निकेतन”, मांजरी (बु.), पुणे येथे ‘झेप’ (वर्ष ३ रे ) उपक्रमाचा समारोप कार्यक्रम उत्साहात पार पडला.

विलू पूनावाला फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जसविंदर नारंग सर यांची समारोप समारंभात प्रमुख पाहुणे आणि अध्यक्षीय स्वरूपात विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्यासमवेत द सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे श्री. रोहित शिंदे आणि श्री. विजय कोल्हटकर, ममता बाल सदनचे अध्यक्ष श्री. दिपक गायकवाड, तसेच द मदर ग्लोबल फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. विनय सपकाळ हे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात माईच्या कन्या व संस्थेच्या अध्यक्षा मा. ममता सिंधुताई सपकाळ यांच्या प्रास्ताविकाने झाली त्यांनी ‘झेप’ उपक्रमाच्या उद्देशांवर प्रकाश टाकत सांगितले की, “ही केवळ उपक्रमाची सांगता नसून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या आत्मविश्वासाचा आणि प्रगतीचा एक टप्पा आहे.

नारंग सर यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, “अनाथ मुलांना ते अनाथ असल्याची जाणीव न होऊ देता, त्यांना कुटुंबवत प्रेम, योग्य शिक्षण आणि सुविधा देणे हेच आदरणीय माई आणि आदरणीय आदर पूनावाला सर यांचे ध्येय आहे. गेल्या पाच वर्षांपासून मी ही संस्था जवळून पाहत असून तिचे कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे”
मान्यवरांच्या हस्ते संस्थेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, विविध भाषांमध्ये विद्यार्थ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली, या प्रसंगी नेस वाडिया कॉलेजच्या प्राचार्या डॉ. वृषाली रणधीर यांनी यंदा पासून दहावीमध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी रु. ५०००/- ची शिष्यवृत्ती सुरू केली आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. दिनेश शेटे, पाहुण्यांचा परिचय श्री. प्रताप चिंचोले, तर आभार प्रदर्शन सौ. पद्मा शिंदे यांनी केले.

‘झेप’ उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संवादकौशल्य, आणि कलेच्या विविध अंगाचा विकास साधत त्यांच्यातील सुप्त गुणांना नवी दिशा दिली आहे. हा उपक्रम अधिकाधिक विद्यार्थी आणि समाजासाठी प्रेरणास्थान ठरेल, याची खात्री आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Up