aappansare.in

Social

पुणे वॉरियर्स व सोलापूर स्मॅशर्समध्ये रंगणार डब्लूएमपीएलचा अंतिम सामना  

Share

पुणे १३ जून २०२५: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित पहिल्या अदानी महिलांच्या महाराष्ट्र प्रीमियर लीग (डब्लूएमपीएल) २०२५ स्पर्धेत उद्या (दि. १४ जून) रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात पुणे वॉरियर्स व सोलापूर स्मॅशर्स एकमेकांना भिडणार आहेत. अंतिम सामना महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय मैदानावर सायं ७ वाजता खेळला जाणार आहे.

पुणे व सोलापूरसह रत्नागिरी जेट्स व रायगड रॉयल्स हे दोन संघ ह्या स्पर्धेत सहभागी झाले होते. साखळी फेरीत पुण्याच्या संघाने त्यांचे सर्व सहा सामने जिंकत थाटात अंतिम फेरी गाठली होती, तर दुसऱ्या बाजूला सोलापूर स्मॅशर्सने सहा पैकी चार सामने जिंकले होते.

पुणे व सोलापूर त्यांचा सलामीचा व अखेरचा साखळी सामना एकमेकांविरुद्ध खेळले होते आणि ह्या दोन्ही सामन्यात पुणे वॉरियर्सने पाच गडी राखून विजय मिळवला होता. असं असलं तरीही, सोलापूर स्मॅशर्स संघाची कर्णधार व आंतरराष्ट्रीय खेळाडू तेजल हसबनीस अंतिम सामन्यासाठी उत्सुक आहे.

“महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने महिलांच्या महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या माध्यमातून अनेक नवीन खेळाडूंना त्यांचा खेळ मोठ्या स्तरावर दाखवण्याची संधी दिली आहे, त्यामुळे मी त्यांची आभारी आहे. ह्या खेळाडूंनी संधीचं सोनं केलं आहे,” असं तेजल अंतिम सामन्याच्या पूर्वसंध्येला म्हणाली.

“अंतिम सामन्यासाठी आम्ही सर्व जणी उत्सुक आहोत. आम्ही पुण्याच्या संघासोबत ह्याआधी दोन वेळा दोन हात हात केले आहेत, त्यामुळे आम्हाला त्यांचा खेळ चांगला माहिती आहे. आम्ही सुरुवातीपासून सामन्यावर पकड मिळवण्याचा व अंतिम सामना जिंकण्याचा प्रयत्न करू,”असं  तेजल पुढे म्हणाली.

पुण्याविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यात ईश्वरी अवसरे व तेजल हसबनीस अपयशी ठरल्या होत्या आणि त्याचा परिणाम सामन्याच्या निकालावर झाला होता. त्यामुळे सोलापूरच्या आघाडीच्या फलंदाजांच्या कामगिरीवर अंतिम सामन्याचा निकाल ठरु शकेल.

पुण्याच्या संघाने सांघिक कामगिरी करत प्रत्येक सामना जिंकला असला तरी पुण्याच्या कामगिरीत कर्णधार अनुजा पाटीलच्या अष्टपैलू कामगिरीचा मोठा वाटा राहिला आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या अनुजाने स्वतःच्या कामगिरीचा वस्तुपाठ घालून देत प्रत्येक खेळाडूकडून उत्तम कामगिरी करुन घेतली आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात पुणे वॉरियर्स संघाचं पारडं जड असेल.

आकडेवारीचा विचार केला तर सर्वाधिक धावांच्या ‘ऑरेंज कॅप’ स्पर्धेत सोलापूरची सलामीची फलंदाज ईश्वरी सावकर (६ सामने, २४७ धावा) व तेजल हसबनीस (६ सामने, २३९ धावा) ह्या पहिल्या दोन क्रमांकावर आहेत. तर पुणे वॉरियर्सची खुशी मुल्ला (६ सामने, १४९ धावा) पाचव्या क्रमांकावर आहे. रत्नागिरी जेट्सच्या गौतमी नाईक (६ सामने, १७३ धावा) व स्मृती मानधना (५ सामने, १५२ धावा) ह्या अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत.  

सर्वाधिक बळींच्या ‘पर्पल कॅप’ स्पर्धेत पुण्याची वेगवान गोलंदाज चिन्मयी बोरपळे (६ सामने, १३ बळी) अव्वल क्रमांकावर आहे, तर पुण्याची कर्णधार अनुजा पाटील (६ सामने, ७ बळी) पाचव्या क्रमांकावर आहे. सोलापूर संघातील फिरकी द्वयी – ऑफस्पिनर मुक्ता मगरे (६ सामने, ९ बळी) व डावखुरी फिरकी गोलंदाज आरती केदार (६ सामने, ९ बळी) अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत.

अंतिम सामन्यात दोन आंतरराष्ट्रीय खेळाडू कर्णधार असलेल्या संघांमध्ये होणाऱ्या हा लढतीत, पुणे वॉरियर्स सोलापूर वर सलग तिसरा विजय मिळवणार का साखळी फेरीतल्या दोन सामान्यातल्या पराभवाचा वचपा सोलापूर स्मॅशर्स काढणार हे बघणं औत्सुक्याचं ठरेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Up