aappansare.in

crime

पुणे : नऊ जणांना पोलीस कोठडी, मेट्रो मार्गावरील आंदोलनाच्या सूत्रधाराचा शोध

Share
police custody, mastermind , Metro, agitation,

पुणे : महापालिका भवन मेट्रो स्थानक परिसरात आंदोलन करणाऱ्या नऊ जणांना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे. एस. भाटिया यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश सोमवारी दिले. या प्रकरणातील उर्वरित आठ आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. मेट्रो मार्गावर आंदोलन प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण आहे, यादृष्टीने तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.

महापालिका भवन मेट्रो स्थानक परिसरात रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) निलंबित करण्यात आलेला नरेंद्र पावटेकर याच्यासह साथीदारांनी आंदोलन केले. पक्षातील वरिष्ठ नेत्यांना कोणतीही कल्पना न देता परस्पर आंदोलन केले होते. या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी नरेंद्र पावटेकर (वय २५), त्याचे वडील ज्ञानेश्वर (वय ६२, दोघे रा. गणेश पेठ) यांच्यासह नऊ जणांना न्यायालयाने सोमवारी दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. उर्वरित आठ आरोपींचा पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

आरोपींना सोमवारी न्यायलयात हजर करण्यात आले. आरोपी पावटेकरने आंदोलन करण्यापूर्वी कोणाशी संपर्क साधला, तसेच संदेश पाठविला, यादृष्टीने तपास करायचा आहे. मेट्रो स्थानक संवेदनशील ठिकाण आहे. आरोपींनी मेट्रो मार्गिका (रुळ), तसेच, इलेक्ट्रिक वायरचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला. पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्याशी झटापट केली. आरोपींनी पोलिसांच्या अंगावर पेट्रोल ओतले. झटापटीत पोलीस निरीक्षक सावंत यांच्यासह पाच महिला पोलीस कर्मचारी जखम झाल्या. आंदोलनामागचा मुख्य सूत्रधार कोण आहे, या दृष्टीने तपास करायचा असल्याने पोलीस कोठडीत देण्याची विनंती सरकारी वकील श्रीधर जावळे यांनी युक्तिवादात केली. न्यायालयाने पावटेकर याच्यासह नऊ जणांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Up