aappansare.in

Educational

दीपक शिकारपूर यांच्या “अभिनव उद्योजकांची यशोगाथा” ६१ व्या पुस्तकाचे प्रकाशन

Share

पुणे, दि. १६ जून – “अभिनव उद्योजकांची यशोगाथा” या डॉ. दीपक शिकारपूर लिखित पुस्तकाचे प्रकाशन पर्सिस्टंट सिस्टीम्सचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आनंद देशपांडे यांनी केले. यावेळी लेखक डॉ. शिकारपूर, ज्येष्ठ उद्योजक दिलीप कुंभोजकर, युरोपातील “आरएमबीएफ”चे प्रमुख रॉबर्ट स्टेझिनर आणि एकविरा प्रकाशनचे भालचंद्र कुलकर्णी उपस्थित होते.

“आरएमबीएफ” आंतरराष्ट्रीय बिझनेक्स्ट कॉन्कलेव्हमध्ये पहिल्या दिवशी (१३ जून) या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलतांना डॉ. देशपांडे म्हणाले की, आम्ही दे-आसरा फाउंडेशनच्या माध्यमातून स्टार्टअप्ससाठी अनेक उपक्रम करत आहोत. अशा पुस्तकातून नवउद्योजक तरुणांना प्रेरणा मिळेल आणि अधिकाधिक उद्योजक तयार होतील, अशी शक्यता वाटते. उद्योग क्षेत्राच्या वाढीमुळेच देशाचा विकास होणार आहे. यावेळी रॉबर्ट स्टेझिनर म्हणाले की, वसुधैव कुटुंबकम ही भारताची संस्कृती आहे, त्यामुळेच उद्योजकांना एक चांगले व्यासपीठ मिळत आहे. प्रादेशिक भाषांमधून तरुणांना समजेल अशी पुस्तके आल्यानेच व्यवसाय वाढीस लागतील.

ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ असलेल्या डॉ. शिकारपूर यांचे हे ६१ वे पुस्तक आहे. याप्रसंगी डॉ. शिकारपूर म्हणाले की, “भारतीय अर्थव्यवस्थेत उद्योजक हे नावीन्य, रोजगार निर्मिती आणि आर्थिक वाढीचे मुख्य चालक आहेत. त्यांच्या योगदानामुळे अनेक घटकांचे जीवनमान उंचावते, उत्पादकता वाढते आणि संपत्तीची निर्मिती होते. एका दृष्टीने ते राष्ट्रनिर्माते आहेत, असे मी समजतो”.

दिलीप कुंभोजकर, भालचंद्र कुलकर्णी, डॉ. दीपक शिकारपूर, डॉ. आनंद देशपांडे आणि रॉबर्ट स्टेझिनर.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Up