aappansare.in

Social

चित्रकथीद्वारे उलगडला ‌‘ती‌’च्या भावभावनांचा पट

Share

पुणे : सामाजिक बंधने, जात-धर्म परंपरा यांच्या चौकटीत अडकलेल्या स्त्रीच्या भावभावनांचा पट उलगडला चित्रकथी या लोककलेच्या माध्यमातून. निमित्त होते ऋत्विक सेंटर आयोजित ‌‘त्याच्या नजरेतून ती‌’ या महिला दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे!

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कोथरूडमधील ऋत्विक सेंटर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोकणातील चित्रकथी आणि राजस्थानमधील कावड कथा या लोककलांमधून प्रेरित होऊन त्यांची सांगड घालत लेखक-दिग्दर्शक शंतनु सायली यांनी समुद्राचा राजा आणि त्याच्या पाच कन्या यांचा जीवनपट नाट्य, कथा, कविता यांचा संगम साधत प्रभावीपणे सादर केला. सुशांत कुंभार  यांनी सादरीकरणात साथ केली तर समिरण बर्डे यांनी ढोलकसाथ केली.

समुद्रातील मँडिगो प्रांताच्या राजाच्या पाच कन्या, त्यांचे बालपणीचे सुखाचे जीवन, युवा अवस्थेत आल्यानंतर त्यांच्या मनातील तरल प्रेमभावना, त्यातील चार राजकन्यांच्या प्रेमविश्वाचे जात-धर्म-संस्कृती-परंपरा या चौकटीत अडकल्यामुळे अपयशी होणे त्यातून राजा म्हणेल त्याच जीवनसाथीची निवड करण्याचे बंधन आणि पाचव्या मुलीचे प्रेम सफल व्हावे यासाठी इतर बहिणींसह अनेकांची लाभलेली साथ परंतु अगदी अखेरच्या क्षणी तिला आलेले अपयश आणि स्त्री म्हणून त्या राजकन्यांना भोगाव्या लागलेल्या वेदना याचे भावपूर्ण दर्शन या चित्रकथीतून प्रभावीपणे समोर आले. कलाकारांनी प्रेक्षकांना या कहाणीत सहभागी करून घेत भावभावनांचा अनोखा धागा जोडला. या चित्रकथीतील चित्रे रोहित मेस्त्री यांनी रेखटली होती तर संगीत तेजस मेस्त्री, अवंती लाटणकर, श्रीनाथ म्हात्रे यांचे होते. देवेंद्र अहिरवार यांच्या राजस्थान की पाच लडकिया या लघु कवितेवर आधारित ही कलाकृती होती.

‘मिथ ऑफ मँडिगोज‌’ सादर करताना सुशांत कुंभार

सावनी तळवलकर यांचे बहारदार तबलावादन

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात सुप्रसिद्ध तबलावादक सावनी तळवलकर यांचे बहारदार तबलावादन झाले. उस्ताद झाकीर हुसेन यांच्या जन्मदिनी आणि महिला दिनाचे औचित्य साधून सादरीकरण करण्यास आनंद होत आहे, अशा भावना व्यक्त करत विलंबित तीन तालातील मध्य लयीतील पेशकार, कायदा, रेला, परण यांचे दमदार सादरीकरण करत सावनी यांनी उपस्थितांना संमोहित केले. त्यांना लहेरासाथ स्वानंद राजोपाध्ये यांनी केली.

Displaying A185813.jpg

सावनी तळवलकर आणि स्वानंद राजोपाध्ये

कलाकारांचा सत्कार चित्रकार प्रसाद भारद्वाज, सरोदवादक अनुपम जोशी यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ संवादिनी वादक अरविंद देशपांडे यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Up