aappansare.in

Social

गुणीजान बंदिश स्पर्धेची अंतिम फेरी दि. 15 ऑक्टोबरपासून पुण्यात

Share

पुणे : गुणीजान रिसर्च आर्ट कल्चर अँड एज्युकेशन (GRACE) फाऊंडेशनतर्फे प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पद्मभूषण पंडित सी. आर. व्यास यांच्या 100व्या जयंतीनिमित्त देशपातळीवर घेण्यात आलेल्या गुणीजान बंदिश स्पर्धेची उपांत्य फेरी ते अंतिम फेरी दि. 15 ते 19 ऑक्टोबर या कालावधीत पुण्यात आयोजित करण्यात आली असून दि. 20 ऑक्टोबर रोजी पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. पद्मभूषण पंडित सी. आर. व्यास (गुणीजान) यांच्या बंदिशींवर आधारित ही स्पर्धा आहे.

अंतिम फेरीचे परीक्षण ज्येष्ठ गायक अभिनेत्री निर्मला गोगटे, तालयोगी पंडित सुरेश तळवलकर, पंडित उल्हास कशाळकर, पंडित साजन मिश्रा, पंडित सुहास व्यास, पंडित सतिश व्यास, विदुषी अश्विनी भिडे-देशपांडे, देवकी पंडित करणार आहेत, अशी माहिती स्पर्धेच्या संयोजक प्रसिद्ध गायिका अपर्णा केळकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. गायक कलाकारांच्या सादरीकरणप्रसंगी रसिकांना उपस्थित राहता येणार आहे. सर्वांना मोफत प्रवेश आहे.

ग्रेस फाऊंडेशनचे संस्थापक तसेच पंडित सी. आर. व्यास यांचे पुत्र शशी व्यास आणि ज्योती व्यास यांच्या पुढाकारातून ही स्पर्धा घेण्यात आली आहे. पंडित सी. आर. व्यास यांचे सांगीतिक विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचावेत, भारतीय शास्त्रीय संगीतातील युवा होतकरू गायकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने पंडित व्यास यांच्या ज्येष्ठ शिष्या अपर्णा केळकर यांच्या संकल्पनेतून प्रथमच देशपातळीवर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 16 ते 30 वयोगटातील गायकांसाठी आयोजित या स्पर्धेत 125 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. प्राथमिक फेरीतून निवड झालेल्या 50 स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. यात 25 मुली आणि 25 मुले आहेत. अंतिम फेरीही स्त्री आणि पुरुष अशा स्वतंत्र गटात होणार असून पहिल्या फेरीतून दहा, दुसऱ्या फेरीतून सहा तर तिसऱ्या फेरीतून प्रत्येकी तीन स्पर्धकांची निवड अंतिम फेरीसाठी केली जाणार आहे.

अंतिम फेरीत पोहोचलेल्यांची स्पर्धा दि. 15 ते दि. 17 ऑक्टोबर या कालावधीत डॉ. श्रीराम लागू रंग अवकाश सभागृह, हिराबाग, पुणे येथे सकाळी 9:30 ते दुपारी 1:30 आणि दुपारी 2:30 ते रात्री 8:30 या कालावधीत होणार असून अंतिम स्पर्धा दि. 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजेपासून सुरू होणार आहे. तर पारितोषिक वितरण समारंभ दि. 20 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.

ऑनलाईन घेण्यात आलेल्या प्राथमिक फेरीचे परीक्षण सुयोग कुंडलकर, चैतन्य कुंटे, अर्चना कान्हेरे, अरुण द्रविड, सुरेश बापट, पल्लवी जोशी, अपूर्वा गोखले, रितेश मिश्रा, आदित्य खांडगे, निषाद बाकरे, नंदिनी बेडेकर, श्रीराम शिंत्रे, रमाकांत गायकवाड, सुमेधा देसाई आणि शाश्वती मंडल या सुप्रसिद्ध गायक-वादकांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Up