aappansare.in

Social

एकपात्री सादरीकरण तुलनेने अवघडच : मानसी मागीकर

Share

पुणे : अभिनय करणे सोपी गोष्ट नाही. प्रत्येकाला अभिनय जमतोच असेही नाही. एखादी भूमिका वठविण्यापेक्षा एकपात्री सादरीकरण ही कला त्याहूनही अधिक अवघड आहे. कसलेले कलावंत नसतानाही श्यामल करंडक स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांनी उत्तम सादरीकरणाचा प्रयत्न केला आहे, असे गौरवोद्गार प्रसिद्ध अभिनेत्री मानसी मागीकर यांनी काढले.
एकपात्री कलाकार परिषद, महाराष्ट्र आणि निळू फुले कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने सौ. श्यामल कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ श्यामल करंडक महिला एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे पारितोषिक वितरण मागीकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. एरंडवण्यातील सेवा भवन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
श्यामल कुलकर्णी यांचे पती अशोक कुलकर्णी, कन्या अनुजा कोल्हटकर यांच्यासह मंजुषा जोशी, भावना प्रसादे, अपर्णा चोथे, अवंती लोहकरे, देवेंद्र भिडे मंचावर होते. प्राथमिक फेरीत महाराष्ट्रातील 59 महिलांनी सहभाग घेतला होता. त्यातील 12 स्पर्धकांमध्ये अंतिम फेरी झाली. प्राथमिक फेरीचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री माधवी सोमण यांच्या हस्ते झाले.
प्रास्ताविकात अनुजा कोल्हटकर म्हणाल्या, आईची एकपात्री कलेविषयीची आस्था बघूनच कुटुंबियांनी महिलांसाठी स्पर्धा सुरू करण्याचा निर्णय घेतला. यंदा स्पर्धेचे चौथे वर्ष आहे. याही वर्षी स्पर्धला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. एकपात्री या कलाप्रकाराची ओळख व्हावी या उद्देशाने अंजली कऱ्हाडकर यांची महिलांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यास महिलांनी चांगला प्रतिसाद दिला. यंदा स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांपैकी 40 स्पर्धकांनी स्वत: संहिता लेखन केले आहे. कार्यशाळेबरोबरच भविष्यात संहिता लेखन, दिग्दर्शन, व्यक्तीमत्त्व विकास असे उपक्रम राबविण्याचा मानस आहे.
मानसी मागीकर पुढे म्हणाल्या, कला कोणतीही असो कलेमुळे आयुष्यात सौंदय निर्माण होते. महिलांना साचेबद्ध आयुष्यातून बाहेर पडण्यासाठी स्पर्धेच्या माध्यमातून सुरू केलेले कार्य अभिमानास्पद आहे.
परिक्षकांच्या वतीने देवेंद्र भिडे आणि अवंती लोहकरे यांनी मनोगत व्यक्त केले. मंजुषा जोशी यांनी एकपात्री कलाकार परिषदेच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता कुलकर्णी यांनी केले तर आभार पल्लवी परब-भालेकर यांनी मानले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल
प्रथम : केतकी पांडे (अब तक छप्पन) : सात हजार रुपये रोख व श्यामल करंडक
द्वितीय : अनघा बुरसे (मी नायिका) : तीन हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह
तृतीय : श्रुती भोसले (माझं नाव) : दोन हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह
उत्तेजनार्थ : मंजुषा लिमये (काशीबाई गोविंद कानिटकर), अनिता पाटील (निखळ प्रेमभंग) : प्रत्येकी एक हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह.
प्रोत्साहनपर प्रशस्तीपत्र : अक्षता साळवी (दांडू)
उत्कृष्ट संहिता : मंजुषा लिमये (काशीबाई गोविंद कानिटकर)
उल्लेखनीय संहिता : केतकी पांडे (अब तक छप्पन)

श्यामल करंडक स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांसह मानसी मागिकर, अशोक कुलकर्णी, अनुजा कोल्हटकर, मंजुषा जोशी, भावना प्रसादे, अपर्णा चोथे, अवंती लोहकरे, देवेंद्र भिडे आदी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Up