‘उत्कर्ष’च्या साहित्य फराळाची विशी’
Share
पुणे : साहित्यिक, वाचकांचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या उत्कर्ष बुक सर्व्हिस येथे खुसखुशीत, खुमासदार साहित्य फराळाचा आस्वाद आज पुणेकरांनी घेतला.

डेक्कन जिमखाना येथील सुप्रसिद्ध उत्कर्ष बुक सर्व्हिस येथे गेल्या वीस वर्षांपासून या उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. पुण्यातील सुप्रसिद्ध लेखक, वाचक या फराळाचा आवर्जून आनंद घेत वैचारिक देवाण घेवाण करतात. आजच्या दिवाळी फराळ गप्पांमध्ये सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रसिद्ध संगणकतज्ज्ञ-लेखक डॉ. दीपक शिकारपूर, श्याम भुर्के, शिरीष चिटणीस, डी. बी. कुलकर्णी, वा. ल. मंजुळ, मालिनी साठे आदी उपस्थित होते.
या वेळी बोलताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, पुण्यात अनेक प्रकाशक, ग्रंथवितरक आणि ग्रंथ विक्रेते आहेत. उत्कर्षचे सु. वा. जोशी यांनी व्यवसायाच्या पलीकडे जाऊन माणसे जोडली आणि जपली. जिव्हाळा दुर्मिळ झालेल्या काळातही उत्कर्ष हे जिव्हाळा जपणारे पुस्तककेंद्र आहे. उत्कर्षमध्ये मला खूप मोठे लेखक भेटले. व्यंकटेश माडगूळकर, शांता शेळके, डॉ रा. चिं. ढेरे, डॉ. ह. वि. सरदेसाई यांना जवळून पाहण्याचा योग उत्कर्षमुळेच आला. हवे ते पुस्तक तत्काळ उपलब्ध करुन देणे ही जोशी यांची खासियत आहे. उत्कर्षमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मी दिवाळी फराळसाठी येत आहे. त्यानिमित्ताने अनेक लेखक आणि वाचकांच्या भेटीगाठी होत निकोप वाङ्मयीन चर्चा होते. इथल्या साहित्यिक फराळाशिवाय दिवाळी सुरू झाली असे वाटत नाही.
सुरुवातीस उत्कर्ष बुक सर्व्हिसचे संचालक सु. वा. जोशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर निलिमा जोशी-वाडेकर यांनी उत्कर्षच्या आगामी उपक्रमांची माहिती दिली.