अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत ४एस पुणेरी बाप्पा संघाची आगेकूच कायम
Share
पुणे, १५ जून २०२५: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) २०२५ स्पर्धेत साखळी फेरीत यश नाहर(५९धावा) याने केलेल्या अर्धशतकी खेळीसह सचिन भोसले(४-३८) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर ४एस पुणेरी बाप्पा संघाने रत्नागिरी जेट्स संघाचा डक वर्थ लुईस नियमानुसार ५ गडी राखून विजय मिळवत आपली आगेकुच कायम राखली.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत ४एस पुणेरी बाप्पा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. धीरज फटांगरे(०) खाते न उघडताच तंबूत परतला. पुणेरी बाप्पाच्या सचिन भोसलेने त्याला झेल बाद केले व संघाला पहिला धक्का दिला. अथर्व धर्माधिकारीने २० धावा केल्या. त्याने तीन चौकार मारले. किरण चोरमले व अथर्व धर्माधिकारी यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३० चेंडूत ५० धावांची भागीदारी केली. किरण चोरमलेने २३ चेंडूत ३७ धावांची आक्रमक खेळी केली. त्यात त्याने ४चौकार व २ षटकार खेचले. चोरटी धाव घेत असताना किरणला निकित धुमाळने स्वतःच्याच गोलंदाजीवर धावबाद केले. दिव्यांग हिंगणेकरने ३३चेंडूत ४३ धावांची खेळी करून संघाची धावगती वाढवली. दिव्यांगने ३चौकार व २षटकार मारले. त्याला अभिषेक पवारने २०, निखिल नाईकने १३ धावा काढून साथ दिली. शेवटच्या रत्नागिरी जेट्सने १२चेंडूत ४ गडी गमावल्या. त्यामुळे निर्धारित षटकात रत्नागिरी संघाला ९बाद १५४धावाचे आव्हान उभारता आले. पुणेरी बाप्पाकडून सचिन भोसले सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ३८ धावात ४ बळी टिपले.

पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना १६ षटकांचा खेळवण्यात आला. विजयासाठी ४एस पुणेरी बाप्पा संघाला १६ षटकात १३२ धावांचे आव्हान होते. मुर्तुझा ट्रंकवाला ७ धावांवर बाद झाला. यश नाहर व मुर्तुझा या जोडीने २८चेंडूत ३८ धावांची भागीदारी केली. पॉवरप्लेमध्ये पुणेरी बाप्पा संघाने १ गड्याच्या बदल्यात ४८ धावा काढून सामन्यावर आपली पकड भक्कम केली. नवव्या षटकातील अखेरच्या चेंडुवर ऋषिकेश सोनावणे २० धावांवर बाद झाला. सत्यजीत बच्चावने त्याला झेल बाद केले. यश नाहरने एका बाजूने खेळताना ३६चेंडूत आपले अर्धशतक साजरे केले. यश ४३चेंडूत ५९ धावा काढून बाद झाला. त्याने ३चौकार व ४षटकार मारले. यश क्षीरसागरने १८चेंडूत ३चौकार व १षटकाराच्या मदतीने ३१धावा काढून यश नाहरला साथ दिली. या जोडीने ३०चेंडूत ४७ धावांची भागीदारी करून संघाला विजयाचा पाया भक्कम केला. शेवटच्या षटकात पुणेरी बाप्पा समोर ६चेंडूत ५धावा असे समीकरण होते. पहिल्याच चेंडूवर रत्नागिरीच्या विजय पावलेने सूरज शिंदेला त्रिफळा बाद केले. त्यानंतर पुढील दोन्ही चेंडूवर एक-एक धाव घेतली. रामकृष्ण घोषने पाचव्या चेंडूवर दोन धावा काढून संघाचा विजय सुकर केला. ४एस पुणेरी बाप्पा संघाने १५.५ षटकात ५बाद १३२धावा करून हे आव्हान पूर्ण केले.

संक्षिप्त धावफलकरत्नागिरी जेट्स: २०षटकात ९बाद १५४धावा(दिव्यांग हिंगणेकर ४३(३३,३x४,२x६), किरण चोरमले ३७(२३,४x४,२x६), अथर्व धर्माधिकारी २०, अभिषेक पवार २०, सचिन भोसले ४-३८, रामकृष्ण घोष १-३३, सोहन जमाले १-१७, निकित धुमाळ १-३०, रोशन वाघसरे १-३५) पराभुत वि.४एस पुणेरी बाप्पा:१५.५ षटकात ५बाद १३२धावा(यश नाहर ५९(४३,३x४,४x६), यश क्षीरसागर ३१(१८,३x४,१x६), ऋषिकेश सोनावणे २०, रामकृष्ण घोष नाबाद ६, दिव्यांग हिंगणेकर २-२६, सत्यजीत बच्चाव १-१९); सामनावीर – यश नाहर