सकल ब्राह्मण समाजाचा भाजप आणि महायुतीला संपूर्ण पाठिंबा
Share
पुणे : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीसाठी भारतीय जनता पक्षाला आणि त्यासोबतच्या महायुतीला सकल ब्राह्मण समाज एकमुखाने पाठिंबा जाहीर करीत असल्याची घोषणा ब्राह्मण संघटनांचे मुख्य समन्वयक भालचंद्र कुलकर्णी यांनी आज येथे केली. भाजपबरोबरच शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी पार्टी (अजित पवार गट) यांच्या महायुतीने ब्राह्मण समाजातील उमेदवारांना देखील प्राधान्य दिल्याने हा पाठिंबा जाहीर करत आहोत. राज्यातील विविध ठिकाणच्या मतदारसंघांमध्ये ब्राह्मण समाजाचा देखील विचार करावा अशी आमची मागणी होती, त्यावर भाजप व महायुतीने सकारात्मक विचार केला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (नागपूर) यांच्या सक्षम नेतृत्वाखाली ही निवडणूक होत आहे, त्यांच्याबरोबरच संजय केळकर (ठाणे), अतुल भातखळकर (कांदिवली), पराग अळवणी (विलेपार्ले), राजन नाईक (नालासोपारा), सुधीर गाडगीळ (सांगली) तसेच उदय सामंत (रत्नागिरी), किरण सामंत (राजापूर) या ब्राह्मण समाजातील उमेदवारांना निवडणूकीत उमेदवारी मिळाल्याने भाजपने सर्वसमावेशक असा विचार केल्याचे दिसून येते. त्याचबरोबर भाजपच्या राज्यातील संघटनात्मक कामाची महत्वपूर्ण जबाबदारीच्या महामंत्रीपदी राजेश पांडे यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे तर कोथरुडच्या माजी आमदार प्रा. मेधाताई कुलकर्णी यांची राज्यसभा खासदारपदी बिनविरोध निवड झाल्याने ब्राह्मण समाजाबद्दल भाजपने दाखवलेल्या सकारात्मक भावनेची आम्ही आनंदाने दखल घेत आहोत.
हिंदुत्वाची पताका आपल्या खांद्यावर घेवून अधिक सकारात्मक काम करणारा राष्ट्रसमर्पित असलेला ब्राह्मण समाज आहे. या समाजाप्रती अत्यंत चांगली अशी सकारात्मक वागणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यात सुरुवातीला खुल्या प्रवर्गासाठी अमृत महामंडळ दिले तर नुकतेच ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ हे स्वतंत्र महामंडळ देखील दिले आहे. याची सार्थ जाणीव आम्हा सर्वांना आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावर ब्राह्मण समाजाने कायमच भाजपला साथ दिलेली आहे. राज्यातील सध्याचे वातावरण पाहता हिंदुत्वाचा मुद्दा भाजपने केंद्रस्थानी ठेवला आहे व हीच ब्राह्मण समाजाची देखील भूमिका आहे. आम्ही पुढील ब्राह्मण संस्था – आम्ही सारे ब्राह्मण, परशुराम सेवा संघ, ब्राह्मण जागृती सेवा संघ, याज्ञवल्क्य आश्रम, चित्पावन अस्तित्व संस्था, देशस्थ ऋग्वेदी शिक्षणोत्तेजक संस्था, सर्व शाखीय ब्राह्मण महासंघ, पुणे, कऱ्हाडे ब्राह्मण संघ, महाराष्ट्र ब्राह्मण सभा, कृष्ण यजुर्वेदी तैतरीय संघ, अखिल ब्राह्मण संघ, राष्ट्रीय सेवा संघ, शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन मध्यवर्ती ब्राह्मण मंडळ, पुणे आणि अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक), पुणे केंद्र या सर्व ब्राह्मण संस्था, संघटनांचे पदाधिकारी हिंदुत्वाचा जयघोष व्हावा या हेतूने भारतीय जनता पक्षाला आणि त्यासोबतच्या महायुतीला जाहीर संपूर्ण पाठिंबा देत आहोत.