aappansare.in

Social

अव्यक्त, अविनाशी, निराकार ज्ञानदेव उलगडले ‌‘नमो ज्ञानेश्वरा‌’तून डॉ. रामचंद्र देखणे साहित्य-कला प्रतिष्ठानची प्रस्तुती

Share

पुणे : महाराष्ट्राला संतांची महान परंपरा लाभली आहे. संतांनी जनमानसास विवेकाचा मार्ग दाखविला, यात ज्ञान, भक्ती, शांती, प्रिती आणि क्रांती यांच्या समन्वयातून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी समतेची पताका हाती घेत भागवत धर्माचा पाया रचला. अशा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा प्रासादिक सांगीतिक जीवनपट ‌‘नमो ज्ञानेश्वरा‌’ या अनोख्या कार्यक्रमातून आज उलगडला.
कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर (750) सुवर्णमहोत्सवी जन्मवर्षानिमित्त डॉ. रामचंद्र देखणे साहित्य-कला प्रतिष्ठानतर्फे आज (दि. 21) भरत नाट्य मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‌‘पुंडलिकवरदा हरि विठ्ठल‌’ या विठ्ठलनामाच्या गजराने कार्यक्रमास सुरुवात झाली तेव्हाच उपस्थितांनी नामघोषात तल्लीन होत एकरूपता साधली. ज्ञानेश्वर महाराज यांनी संपूर्ण विश्वाचे माऊलीपद स्वीकारून समाजातील प्रत्येक व्यक्तीला समतेच्या माध्यमातून विवेकाचा मार्ग कसा दाखविला, त्याची महती काय, समकालीन आणि इतर संतांनी ज्ञानेश्वर माऊलींचे केलेले वर्णन यांचा गोफ विणत संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त आणि पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे यांनी संतवचने, भगवत्‌‍गीतेतील लोक, ज्ञानेश्वरीतील दाखले, संस्कृत सुभाषिते, काव्य यांच्या माध्यमातून ज्ञानेश्वर माऊलींचे श्रेष्ठत्व निरूपणाच्या माध्यमातून उपस्थितांसमोर मांडले.
संत वचनांचे अनुकरण करणाऱ्या आणि त्याचा द्वेष करणाऱ्या दोघांनाही संत-माऊली मायाच देतात, प्रत्येकाच्या मनात भक्तीचा मळा फुलविण्याचा प्रयत्न करतात, जो पर्यंत भक्त आपले सर्वस्व भगवंताला अर्पण करत नाही तो पर्यंत त्याची ओढ लागत नाही, अशा अनेक शिकवणुकीदेखील डॉ. भावार्थ यांनी समर्थपणे मांडल्या.
उपस्थितांमधील प्रत्येकाच्या मनात भावनांचा कल्लोळ उठवत डॉ. पूजा देखणे यांनी ज्ञानेश्वर माऊलींचा समग्र जीवनपट अतिशय ताकदीने-तयारीने सादर केला. माऊली व इतर भावंडांच्या जन्माच्या पूर्वपिठीकेपासून ते माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यापर्यंत केलेले वर्णन ऐकताना सगुण-निर्गुण भक्तीच्या पलिकडेही आत्म्याचा आत्म्याशी संवाद होऊ शकतो अशी अनुभूती प्रत्येकास आली.
अवधूत गांधी यांनी निरूपण व कथानकाच्या अंगाने स्पर्श करीत अनेक अभंगांचे, संत रचनांचे अतिशय समधुर आवाजात सादरीकरण करताना ‌‘ओम नमो ज्ञानेश्वरा‌’, ‌‘अनुपम्य मनोहर कासे शोभे पितांबर‌’, ‌‘पूर्वजन्मी सुकृते‌’, ‌‘अजी सोनियाचा दिनु‌’, ‌‘गुरू हा संतकुळीचा राजा‌’, ‌‘ऐसा योगिराज‌’, ‌‘ओम नमो जी आद्या‌’ अशा ज्ञानेश्वर माऊलींच्या रचना ऐकविल्या. ‌‘परिमळाची धाव भ्रमर वोढी‌’, ‌‘नवल देखिले‌’ यांसह काही रचना प्रियांका ढेरंगे-चौधरी यांनी सादर केल्या.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी रचलेल्या ज्ञानेश्वरीतून श्रोतृसंवाद घडतो, अमृतानुभवाच्या माध्यमातून आत्मसंवाद घडतो, हरिपाठाच्या माध्यमातून लोकसंवाद घडतो तर चांगेदव पासष्टीच्या माध्यमातून शिष्यसंवाद घडतो आणि त्यातूनच जनमानस ब्रह्मसाक्षर होतो याची भावानुभूती ‌‘नमो ज्ञानेश्वरा‌’ या प्रासादिक कार्यक्रमात आज उपस्थितांना आली.
कार्यक्रमाचे संहिता लेखन डॉ. पूजा देखणे यांचे होते. केदार दिवेकर यांचे पार्श्वसंगीत होते तर अभय नलगे, राजेंद्र बघे, चैतन्य पवार, प्रसाद भांडवलकर यांनी समर्पक साथसंगत केली. संगीत संयोजन गौरव धावडे तर प्रकाश योजना ओंकार दसनाम यांची होती.
संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे प्रमुख विश्वस्त निरंजन नाथ, संत तुकाराम महाराज संस्थानचे नितीन महाराज मोरे, भगवान महाराज साळुंखे, डॉ. माधवी वैद्य, विठ्ठल-रुख्मिणी मंदिर पंढरपूरच्या विश्वस्त माधवी निगडे, विश्राम कुलकर्णी, दिग्‌‍पाल लांजेकर, डॉ. मिलिंद भोई, महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, प्रसिद्ध साहित्यिक डॉ. संगीता बर्वे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.फोटो ओळ : ‌‘नमो ज्ञानेश्वरा‌’ कार्यक्रम सादर करताना डॉ. भावार्थ देखणे, डॉ. पूजा देखणे, अवधूत गांधी व सहकारी.

नमो ज्ञानेश्वरा‌’ कार्यक्रम सादर करताना डॉ. भावार्थ देखणे, डॉ. पूजा देखणे, अवधूत गांधी व सहकारी.

नमो ज्ञानेश्वरा‌’ कार्यक्रम सादर करताना डॉ. भावार्थ देखणे, डॉ. पूजा देखणे, अवधूत गांधी व सहकारी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Up