सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासासाठी सहकार विभाग सदैव तत्पर – संजय राऊत, जिल्हा उपनिबंधक
Share
पुणे, दि. ३ जून – गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या पुनर्विकासासाठी तसेच कन्व्हेअन्स आणि डिम्ड कन्व्हेअन्स प्रक्रिया राबविण्यासाठी सहकार विभाग सदैव तत्पर असून यातील कायदेशीर बाबी समजावून सांगण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असल्याचे सहकार विभागाच्या पुणे शहराचे जिल्हा उपनिबंधक संजय राऊत यांनी येथे सांगितले.
महाराष्ट्र सोसायटीज वेल्फेअर असोसिएशन (महासेवा) आणि को-पेक्स–दी को-ऑपरेटिव्ह एक्स्पर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कन्व्हेअन्स, पुनर्विकास व स्वयं-पुनर्विकास जनजागृती’ यावर नुकतेच चर्चासत्र पार पडले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राऊत यांनी याबाबत आवश्यक कागदपत्रे, नोंदणी प्रक्रिया व सहकार खात्याच्या विविध यशस्वी उपक्रमांची सखोल माहिती देखील यावेळी दिली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संजय राऊत (जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर), पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट फेडरेशनचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, ज्येष्ठ विधीज्ञ व निवृत्त आयएएस अधिकारी श्यामसुंदर पाटील (महसूल विभाग, महाराष्ट्र शासन) आणि महासेवा चे संस्थापक अध्यक्ष सीए रमेश प्रभू यांनी विशेष उपस्थिती लावली. या निमित्ताने पुनर्विकास व स्वयं-पुनर्विकास यावरील माहितीपर पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी सुहास पटवर्धन यांनी पुनर्विकास प्रक्रियेत व्यावसायिक व तज्ञांच्या योग्य मार्गदर्शनाचे महत्त्व विशद केले. तसेच, सहकारी संस्थांनी योग्य नियोजन व नियोजनबद्ध कार्यपद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन केले. श्यामसुंदर पाटील यांनी कन्व्हेअन्स व डिम्ड कन्व्हेअन्स प्रक्रियेत येणाऱ्या विविध अडचणी, स्टॅम्प ड्युटी संबंधित समस्या याबाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच या समस्यांचे प्रभावी निराकरण करण्याच्या उपाययोजना स्पष्ट केल्या. सीए रमेश प्रभू यांनी स्वयं-पुनर्विकासाच्या गरजेवर प्रकाश टाकत रेरा कायद्याखालील पारदर्शक आणि नियमबद्ध प्रक्रियेचे महत्त्व सांगितले. त्यांनी व्यावसायिक सल्लागारांच्या भूमिकेबाबतही उपस्थितांना बहुमूल्य माहिती दिली. या चर्चासत्रात सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी व सदस्य, ज्येष्ठ विधीज्ञ, चार्टर्ड अकाऊंटंट, बांधकाम व्यावसायिक आणि संबंधित क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. या चर्चासत्राचे सूत्रसंचालन सीए चैतन्य वाखारिया यांनी केले. या चर्चासत्राच्या यशस्वी आयोजनासाठी महासेवा पुणेचे अध्यक्ष सीए सचिन शर्मा, को-पेक्सचे संस्थापक सीए दिपेश पटेल आणि सीए ऋषिकेश कोठावळे यांनी सर्व उपस्थितांचे आणि वक्त्यांचे आभार मानले.

ऋषिकेश कोठावळे, श्यामसुंदर पाटील, रमेश प्रभू, संजय राऊत, दिपेश पटेल व सचिन शर्मा