शिवराजाभिषेक – एका नव्या युगाचा प्रारंभ”: पांचजन्य फा वतीने माजी खासदार रावत यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम
Share
पुणे, ८ जून – सध्याच्या परिस्थितीत भारत देशाची वाटचाल प्रगतीच्या दिशेने सुरु असून देश भौतिक व संरक्षणदृष्ट्या अधिक सक्षम होतो आहे, हे चित्र म्हणजे आपण आपल्या इतिहासाकडून घेतलेला बोध आहे, असे मत माजी खासदार आणि भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत यांनी आज येथे एका मुलाखतीत बोलतांना व्यक्त केले आहे.
पांचजन्य फाउंडेशन, मएसो सिनियर कॉलेज आणि युवामर्ष या संस्थांच्या वतीने माजी खासदार रावत यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
“शिवराजाभिषेक – एका नव्या युगाचा प्रारंभ” या विषयावर अमोघ वैद्य यांनी मुलाखत
घेतली.
शिवराजाभिषेक ही आपल्या इतिहासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आणि प्रेरणादायी अशी घटना आहे, असे नमूद करुन रावत म्हणाले की, यामुळे देशाला नवी दृष्टी प्राप्त झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्णायक अशा संघर्षातून बलाढ्य, बळकट असे स्वराज्य निर्माण केले. नवीन किल्ले बांधले, आरमार उभे केले, मंदिरे बांधली. अनेक वर्षाच्या
संघर्षावर त्यांनी विजय मिळवला आहे. आजच्या वर्तमानकाळात देखील हा इतिहास प्रेरणा देणारा आहे. आपण सर्वजण मिळून एकत्र आलो तर कोणत्याही संकटावर यशस्वीपणाने मात करु शकू, असे ते म्हणाले.
आपल्या देशावर आजवर अनेक आक्रमणे झाली, आपली संस्कृती अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला, असे नमूद करुन ते म्हणाले, आपण परंपरा, संस्कृतीचे पूजक आहोत. देशाला बांधणारा हा मुख्य धागा आहे. आजच्या काळात देखील इतिहासाचा अभ्यास आणि विश्लेषण करणे आवश्यकच आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. मुलाखतीच्या माध्यमातून त्यांनी इतिहासातील अनेक घटनांचा वेध घेतला.