aappansare.in

Social

राहुल घोरपडे प्रतिभाश्रीमंत संगीतकार‌’

Share


अनन्वयतर्फे राहुल घोरपडे यांना गीत सुमनांजली
पुणे : राहुल घोरपडे हे भावसंगीतकार असूनही त्यांना शास्त्रीय संगीताची उत्तम जाण होती. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या रचना सोप्या असल्या तरी त्यांची मांडणी अनवट आणि अतिशय प्रभावी असे. त्यांच्या संगीत रचनांचे साधेसोपे कोडे कुणालाच सुटले नाही. शब्दातील भाव ओळखून स्वरातील भाव ते सहजतेने सांभाळत असत. ते जन्मत:च प्रतिभाश्रीमंत संगीतकार होते, असे भावोद्गार संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकारांनी व्यक्त केले.
चतुरस्र संगीतकार राहुल घोरपडे यांना ‌‘अनन्वय‌’च्या वतीने गीत सुमनांजली वाहण्यात आली. द बॉक्स येथे आयोजित सांगीतिक कार्यक्रमात पंडित रघुनंदन पणशीकर, पंडित शौनक अभिषेकी, प्रसिद्ध गायक रवींद्र साठे, ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे यांच्यासह अनुराधा कुबेर, राजीव बर्वे, मनिषा निश्चल, सौरभ दफ्तरदार, मनिषा पवार, मीनल पोंक्षे, कुमार करंदीकर यांचा सहभाग होता. कलाकारांना विजय उपाध्ये, कुमार करंदीकर, केदार परांजपे, आदित्य आपटे, विनित तिकोनकर, निलेश श्रीखंडे यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाची संकल्पना डॉ. माधवी वैद्य यांची होती. राहुल घोरपडे यांच्या संगीताचे चाहते, अनेक गायक, संगीतकार, संगीत संयोजक यांची भावभिजलेली उपस्थिती या कार्यक्रमास लाभली.
संत ज्ञानेश्वर महाराज रचित ‌‘सावळे परब्रह्म‌’ यासह कुसुमाग्रज, कवयित्री बहिणाबाई, आरती प्रभू, शांता शेळके, इंदिरा संत, कवी ग्रेस, दत्ता हलसगीकर, डॉ. राहुल देशपांडे या कवींच्या रचना ‌‘माझ्या मातीचे गायन‌’, ‌‘काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात‌’, ‌‘माझी माय सरसोती‌’, ‌‘देवा घरोटं घरोटं‌’, ‌‘असेन मी नसेन मी‌’, ‌‘रोज रात्री आमच्या घरात‌’, ‌‘झाला सूर्यास्त राणी‌’, ‌‘येता जाता तिने छळावे‌’, ‌‘देहू आळंदीचे देव‌’, ‌‘पंढरपुरीचा निळा‌’, ‌‘आलो इथे कशाला?‌’, ‌‘अंधार असा घनभारी‌’, ‌‘किती तुला आठवावे‌’, ‌‘नदी काठावर कर्दळीचे बन‌’ आदी रचना सादर करण्यात आल्या.
आठवणींना उजाळा देताना पंडित शौनक अभिषेकी म्हणाले, राहुल घोरपडे यांच्यावर अनेक संगीतकारांचे संस्कार होते. विशेषत: श्रीनिवास खळे आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा प्रभाव अधिक होता. ते साहित्य-काव्याचे मर्मज्ञ ज्ञानी होते. निरपेक्ष भावनेतून शिकायला मिळणार हा स्वार्थ घेऊन मी अनेकदा त्यांच्या रचना गायलो आहे.
पंडित रघुनंदन पशणीकर म्हणाले, शब्दांचा योग्य अर्थ ओळखून चाल देणे हा निसर्गाचा चमत्कार राहुल घोरपडे यांना साधला होता.
अनुराधा मराठे म्हणाल्या, कविता, गीतांना चाली लावण्यात राहुलचा वेगळाच दृष्टीकोन असायचा. त्याने संगीतबद्ध केलेली गाणी सादर करणे सोपे नसायचे. त्यासाठी खूप तयारी लागायची. शब्दांवर जोर, मिंडचे प्रकार, अवरोही जागा गळ्यावर चढविण्यासाठी सराव करायला लागायचा.
अनन्वय हे राहुल घोरपडे यांच्या सुरांचे मुक्तांगण होते. कवीला अभिप्रेत अर्थ समजून उमजून शब्दोचाराच्या ऱ्हस्व-दीर्घांसह काव्य संगीतबद्ध करणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांना सुरांचेच नव्हे तर तालाचेही अफाट ज्ञान होते, अशा आसावरी राहुल घोरपडे यांच्या भावना सोनाली श्रीखंडे यांनी मांडल्या. सौरभ दफ्तरदार म्हणाले, शब्दच नव्हे तर विरामचिन्हांनाही चाल देणे हे राहुल घोरपडे यांचे वैशिष्ट्य होते.
राहुल घोरपडे यांच्या आठवणींना उजाळा देत सोनाली श्रीखंडे यांनी ओघवत्या शैलीत निवेदन केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Up