राम गणेश गडकरी यांची बदनामी, सीकेपी समाज ठाण्यात आक्रमक
Share
अमोल मिटकरींवर कारवाईची मागणी.
ठाणे – भारताचे भारताचे शेक्सपियर म्हणून ओळखले जाणारे भाषा प्रभूराम गणेश गडकरी यांची बदनामी केल्याच्या निषेधार्थ एकवटलेल्या चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाने ठाणे शहरात आज तीव्र निदर्शने करून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचा जाहीर धिक्कार केला. अर्धवट माहितीवर आधारित मराठी भाषेला वैभव प्राप्त करून देणाऱ्या राम गणेश गडकरी यांच्या विरोधात बदनामीकारक विधाने केल्याबद्दल संतप्त सीकेपी समाज बांधवांनी अमोल मिटकरी यांच्या फोटोला काळे फासले व त्यांच्यावर कारवाईची मागणी केली.
भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांची बदनामी केल्याच्या निषेधार्थ गेले काही दिवस चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजात मोठा असंतोष निर्माण झाला होता. भारताचे शेक्सपियर म्हणून संपूर्ण जगात ओळख असलेल्या व मराठी भाषेचे वैभव वाढवणाऱ्या राम गणेश गडकरी यांच्या विरोधात अपुऱ्या माहितीवर केलेल्या विधानांमुळे सीकेपी समाजात तीव्र नाराजी पसरली होती. त्याचे पडसाद आज ठाण्यात उमटले. ठाणे शहरात जमलेल्या सीकेपी बांधवांनी ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहासमोर तीव्र निदर्शने केली व अमोल मिटकरी यांच्यावर कारवाईची मागणी केली. तसे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवण्यात आले तसेच जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर करून अमोल मिटकरी यांच्यावर कारवाईची मागणी केली.
भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांची बदनामी आम्ही सहन करणार नाही असा इशारा आंदोलकांतर्फे अखिल भारतीय सीकेपी मध्यवर्ती चे अध्यक्ष समीर गुप्ते यांनी याप्रसंगी दिला. राजसन्यास नाटक त्यातील घटना व प्रसंग जेष्ठ पत्रकार तुषार राजे यांनी विशद केले.गडकरी यांच्या पूर्वी प्रत्येक लेखक, नाटककार आदींनी छत्रपती संभाजी महाराजांचे कसे विकृत चित्र रंगविले व राम गणेशांनी लढवय्ये संभाजी महाराज कसे दाखविले याची माहिती दिली.
सीकेपी समाजाची मंडळी अनेक वर्षानंतर प्रथमच रस्त्यावर उतरून आंदोलन करताना आज दिसली. त्यांच्या तीव्र भावना होत्या. जर अमोल मिटकरी यांच्यावर कारवाई झाली नाही तर यापुढे महाराष्ट्राच्या जिल्हा जिल्ह्यात व तालुकास्तरावर निदर्शने व निवेदने देण्यात येणार असल्याचे याप्रसंगी समीर गुप्ते यांनी जाहीर केले. या आंदोलनात मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्ष समीर गुप्ते जेष्ठ पत्रकार तुषार राजे, रामानंद सुळे अतुल फणसे, गिरीश राजे विकास देशमुख , जयदीप कोरडे, राजीव प्रधान , विनय चौबळ, शिरीष गडकरी ,दीपक फणसे,नागेश कुळकर्णी, यशवंत रणदिवे,चंद्रशेखर देशपांडे,किशोर राजे , नितीन वैद्य, प्रकाश दिघे,तेजस राजे, राधिका गुप्ते योगिनी चौबळ, पूजा सुळे यांच्यासह शेकडो समाज बांधव उपस्थित होते.