रामजीबाबांच्या पालकत्वातून बाबासाहेब आंबेडकर यांची जडणघडण : डॉ. श्रीपाल सबनीसराजेंद्र पवार यांचा रामजीबाबा आंबेडकर स्मृती पुरस्काराने गौरव
Share
पुणे : अंधाराच्या साम्राज्याला संपवून प्रकाशपेरणी करत असणाऱ्या तसेच आचार, विचार आणि कृतिशीलतेमुळे ख्याती मिळालेल्या राजेंद्र पवार यांना रामजीबाबा आंबेडकर यांच्या पवित्र नावाचा पुरस्कार मिळाला आहे ही अभिमानाची बाब आहे. रामजीबाबा यांच्या शिकवणुकीतूनच बाबासाहेब आंबेडकर शिक्षित झाले. जाणीवपूर्वक संगोपन करणारे पालक म्हणून रामजीबाबा यांचे कार्य मोलाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महामाता रमाई महोत्सवात रविवारी रामजीबाबा आंबेडकर स्मृती पुरस्काराने महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांचा गौरव करण्यात आला. त्या वेळी डॉ. सबनीस बोलत होते. महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड, लता राजगुरू, ॲड. अविनाश साळवे, धनंजय सूर्यवंशी मंचावर होते. दि. 7 फेब्रुवारी 2025 पर्यंत महामाता रमाई महोत्सव सायंकाळी 6 ते 8 या वेळात रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, वाडिया कॉलेज समोर येथे होणार आहे.
डॉ. सबनीस पुढे म्हणाले, बाबासाहेब आंबेडकर यांनी वडिलांच्या प्रोत्साहनातूनच उच्च शिक्षण प्राप्त केले, त्यामुळेच विकृत समाजव्यवस्थेला बदलत जातीव्यवस्थेला उलथवून टाकण्याचे कार्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातून घडले. रामजीबाबा यांचे कार्य उपेक्षित राहिले होते. त्यांच्या नावे पुरस्कार देण्यातून मुलाच्या जडणघडणीत वडिलांचे महत्त्व अधोरेखित होत आहे. या पुरस्कारात सद्भाव आहे तसेच महामाता रमाई महोत्सव हा धर्मनिरपेक्ष असून अनेक जातींच्या एकत्रतेचा उत्सव आहे.
माझे काम अंधारलेल्या वाटा प्रकाशमान करण्याचे आहे, असे सांगून सत्काराला उत्तर देताना राजेंद्र पवार म्हणाले, रामजीबाबा आंबेडकर यांच्या नावे मिळालेल्या पुरस्काराचे मोल मी जाणून आहे. माझे काम म्हणजे पगारी समाजसेवा असून अडीअडचणीतून मार्ग काढत वाड्या, वस्त्या, शेती यांना वीज पुरवठा करणे आहे. माझ्या हातून गेली 36 वर्षे हे काम अव्याहतपणे सुरू आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्याविषयी ॲड. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविकात माहिती दिली तसेच राजेंद्र पवार यांच्या कार्याची ओळख करून दिली. राजमीबाबा आंबेडकर यांच्या नावे दिलेला पुरस्कार योग्य व्यक्तीस देण्यात आला आहे, असे ॲड. अविनाश साळवे म्हणाले. मान्यवरांचा सत्कार व आभार प्रदर्शन लता राजगुरू यांनी केले. सूत्रसंचालन विठ्ठल गायकवाड यांनी केले.

रामजीबाबा आंबेडकर स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यात (डावीकडून) ॲड. अविनाश साळवे, लता राजगुरू, ॲड. प्रमोद आडकर, राजेंद्र पवार, डॉ. श्रीपाल सबनीस, विठ्ठल गायकवाड.