मुलाच्या मोबाइलवर मालिका बंद केल्याच्या रागातून मुलाकडून आईवर जीवघेणा हल्ला:पुण्यातील धनकवडी परिसरातील धक्कादायक घटना
Share

अल्पवयीन मुलाच्या मोबाइलवरील मालिका संपली असल्याने ती बंद केल्याच्या रागातून अल्पवयीन मुलाने आईवर कात्रीने जीवघेणा वार करण्याचा प्रयत्न केला.तसेच मुलाने घरातील खिडकीच्या काचा फोडून आईला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना धनकवडी परिसरात घडली
याबाबत त्याच्या आईने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.याप्रकरणी अल्पवयीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला धनकवडी भागात राहायला आहे. सोमवारी रात्री उशीरापर्यंत मुलगा मोबाइलवरील मालिका पाहत होता. त्यावेळी आईने जास्त वेळ मोबाइलवरील मालिका पाहू नको, असे सांगितले. त्यानंतर तो मालिका पाहत होता. त्यामुळे आईने त्याच्या हातातून मोबाइल हिसकावून घेतला आणि मालिका बंद केली. आईने मोबाइल हिसकावून घेतल्याने मुलगा रागावला. त्याने थेट आईला मारहाण करण्यास सुरुवात केली. घरातील लाकडी फ्रेम तिच्या डोक्यात फोडली, तसेच कात्रीने आईवर बेदम वार करण्याचा प्रयत्न केला. आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन घरातील खिडकीच्या काचा फोडल्या.घाबरलेल्या आईने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिस उपनिरीक्षक एस काळे यांनी घटनास्थळी भेट दिली. हवालदार एन जाधव पुढील तपास करत आहेत.