aappansare.in

Social

मातृत्व, नेतृत्व, कर्तव्याचा सन्मान संस्काराची जपणूक करणारा : केतकी कुलकर्णी

Share

पुणे : आपल्या आवडीच्या क्षेत्रात कर्तृत्वाच्या बळावर ठसा उमटविणाऱ्या महिलांचा ‌‘कऱ्हाडे भूषण राणी लक्ष्मीबाई‌’ पुरस्काराने केलेला सन्मान हा भविष्यातील वाटचालीसाठी उर्जा देणारा ठरेल, असे प्रतिपादन पुणे महिला मंडळाच्या अध्यक्षा केतकी कुलकर्णी यांनी केले. मातृत्व, नेतृत्व आणि कर्तव्याचा हा सन्मान संस्काराची जपणूक करणारा आहे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त कऱ्हाडे ज्ञातीतील विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा ‌‘कऱ्हाडे भूषण राणी लक्ष्मीबाई‌’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सन्मान केतकी कुलकर्णी आणि कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेच्या अध्यक्षा मुक्ता चांदोरकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी कुलकर्णी बोलत होत्या. कर्वेनगरमधील युनायटेड वेस्टर्न सोसायटी सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. सुचित्रा कुलकर्णी, श्रुती नाटेकर, सुधाताई जावडेकर, मुक्ता पंडित, वृषाली आठल्ये, मंजिरी धामणकर यांचा ‌‘कऱ्हाडे भूषण राणी लक्ष्मीबाई‌’ पुरस्काराने तर वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या अनुराधा देसाई, सुनंदा बेळगी, निला शेवडे, सुनिता सरदेसाई, अरुणा पळसुले-देसाई, इंदूताई धामणकर, शीला महाजनी, उषाताई नानल यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

शंभरीकडे वाटचाल करीत असलेल्या कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेच्या कार्याचा गौरव करून केतकी कुलकर्णी म्हणाल्या, संस्कारक्षम पिढी घडविण्याचे तसेच संघटनात्मक दृष्टीने सुरू असलेले कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेचे काम अभिनंदनीय आहे.

पुरस्कारप्राप्त महिलांच्या वतीने बोलताना मुक्ता पंडित म्हणाल्या, पुरस्काराच्या रूपाने कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणे यांच्याकडून मिळालेली कौतुकाची थाप भविष्यातील वाटचालीसाठी उपयुक्त तसेच उत्साह वाढविणारी ठरणार आहे.

पुरस्काराविषयी प्रास्ताविकात माहिती सांगताना कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेच्या अध्यक्षा मुक्ता चांदोरकर म्हणाल्या, कऱ्हाडे ज्ञातीतील महिला आपल्या बुद्धी-युक्तीच्या जोरावर विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. आपल्या कर्तृत्वाने त्यांनी यशाचे शिखर गाठले आहे. त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव व्हावा या दृष्टीने यशस्वी महिलांचा गेल्या काही वर्षांपासून ‌‘कऱ्हाडे भूषण राणी लक्ष्मीबाई‌’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात येत आहे.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, पुरस्कारप्राप्त महिलांचा परिचय आणि आभार प्रदर्शन अद्वैता उमराणीकर यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Up