aappansare.in

Social

पखवाज, बासरी वादनाची रंगणार मैफल : गुरू-शिष्यांचे सहवादनऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌‍तर्फे शनिवारी ‌‘परंपरा‌’ संगीत मैफलीचे आयोजन

Share


पुणे : ऋत्विक फाऊंडेश फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌‍ आयोजित ‌‘परंपरा‌’ या मालिकेअंतर्गत पखवाज आणि बासरी वादनाची सुरेल मैफल रंगणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दि. 15 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 5:00 वाजता ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌‍, वेदभवन जवळ, कोथरूड येथे करण्यात आले आहे.
शिष्यांना आपल्या गुरुंसोबत मैफलींना जाण्याची संधी उपलब्ध होते; परंतु त्यांच्यासह सादरीकरणाची संधी क्वचितच मिळते. ‌‘परंपरा‌’ मैफलीअंतर्गत ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌‍च्या माध्यमातून सुप्रसिद्ध पखवाज वादक सुखद मुंडे यांच्यासह त्यांच्या शिष्यांना तसेच सुप्रसिद्ध बासरी वादक पंडित रूपक कुलकर्णी यांच्यासह त्यांच्या शिष्यांना एकाच मंचावर वादनाची संधी प्राप्त होणार आहे.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात सुखद मुंडे यांच्यासह कृष्णा नवगिरे, हर्ष पाटील, मंगेश खैरनार आणि प्रदिप दराडे हे शिष्य पखवाज वादन करणार असून त्यांना संतोष घंटे संवादिनीवर साथ करणार आहेत.
दुसऱ्या सत्रात पंडित रूपक कुलकर्णी यांच्यासह त्यांचे शिष्य मृगेंद्र मोहडकर, लितेश जेठवा, मेहुल प्रजापती, तनय कामत, रिंगचड ब्रह्मा आणि रेणुका लिखिते बासरी वादन करणार आहेत. वादकांना महेशराज साळुंके तबलासाथ करणार आहेत.
सुखद मुंडे यांनी वयाच्या सहाव्या वर्षापासून त्यांचे वडिल सुप्रसिद्ध पखवाज वादक पं. माणिक मुंडे यांच्याकडून पखवाज व तबला वादनाची तालीम घेतलेली आहे. सुखद यांनी जगविख्यात गायक-वादकांना तसेच अनेक कथक नृत्याविष्कारांना पखवाजची साथ केली आहे. देश-विदेशात अनेक प्रसिद्ध संगीत महोत्सवांमध्ये त्यांचे वादन झाले आहे. त्यांनी पुणे विद्यापीठातून पखवाज वादनात एम्‌‍.ए. पदवी प्राप्त केली आहे.
रूपक कुलकर्णी हे जगविख्यात बासरी वादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे पहिले गंडाबंध शिष्य आहेत. वडिल पंडित मल्हारराव कुलकर्णी यांच्यामुळे रूपक यांना संगीतात रुची निर्माण झाली. वयाच्या नवव्या वर्षापासून त्यांनी प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यांना धृपद व खयाल गायकीचेही मार्गदर्शन मिळाले आहे. पंडित रूपक कुलकर्णी यांनी देशविदेशात बासरी वादनाच्या अनेक मैफली गाजविल्या आहेत तसेच विविध संगीत महोत्सवांमध्ये बासरी वादन केले आहे. मधुर आलाप, मंत्रमुग्ध करणारी लयकारी आणि सर्जनशीलता हे रूपक कुलकर्णी यांच्या वादनाचे वैशिष्ट आहे.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

सुखद मुंडे

रूपक कुलकर्णी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Up