धम्मप्रचारक निलेश गायकवाड यांचा संत कबीर पुरस्काराने गौरव
Share
कबीरवाणीकार रतनलाल सोनग्रा यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण
पुणे : महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातर्फे संत कबीर यांच्या जयंतीनिमित्त धम्मप्रचारक निलेश गायकवाड यांचा आज संत कबीर पुरस्काराने गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण कबीरवाणीकार आचार्य रतनलाल सोनग्रा यांच्या हस्ते झाले.
संत कबीर यांच्या जयंतीचे औचित्य साधून वाडिया कॉलेज जवळील महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संयोजक विठ्ठल गायकवाड, माजी नगरसेविका लता राजगुरू, भगवान धेंडे, फिरोज मुल्ला, बाबा ओव्हाळ, सचिन गायकवाड उपस्थित होते.
निलेश गायकवाड यांचा परिचय आणि पुरस्काराविषयी विठ्ठल गायकवाड यांनी माहिती दिली.
या वेळी बोलताना आचार्य सोनग्रा म्हणाले, संत कबीर यांनी देशात मानवी समतेचा उद्घोष सुरू केला. समाजातील दुष्ट चालीरिती, प्रथा या विषयी जनजागृती करत विद्रोहाचा प्रारंभ करून विवेकवादाची मशाल प्रज्वलीत केली. संत कबीर यांच्या विचारांची आज देशाला आवश्यकता आहे.
मान्यवरांचे स्वागत लता राजगुरू यांनी केले तर सूत्रसंचालन विठ्ठल गायकवाड यांनी केले.

संत कबीर जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात निलेश गायकवाड यांचा संत कबीर पुरस्काराने गौरव करताना आचार्य रतनलाल सोनग्रा. समवेत लता राजगुरू, विठ्ठल गायकवाड आदी.