जयगणेश व्यासपीठमधील गणेश मंडळांचा उपक्रम
Share
पुणे : मुळशी तालुक्यातील गोरगरीब कष्टकरी कातकरी, कातकरी व आदिवासी वस्तीवरील पस्तीस कुटुंबांसोबत दिवाळीसण साजरा करण्याचा अभिनव विधायक उपक्रम जय गणेश व्यासपीठमधील गणेश मंडळांनी राबविला.
दिवाळीचा आनंद वंचितांना देखील साजरा करता यावा म्हणून पुण्यातील गणेश मंडळे 12 वर्षांपासून हा उपक्रम राबवित आहेत.
बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्ट, मॉडेल कॉलनी येथील अजिंक्य मित्र मंडळातर्फे लवासा रस्त्यावरील पिरंगुट, गाढववाडी व कुंभारवाडी येथील पस्तीस कुटुंबांना लाडू, चिवडा, करंजी, चकली, शंकरपाळी या दिवाळीच्या फराळासह आकाश दिवे, पणत्या, फटाके व कपडे भेट देण्यात आले.

आदिवासी व कातकरी बांधवांसोबत दिवाळी साजरी करताना साईनाथ मंडळ ट्रस्ट व अजिंक्य मित्र मंडळाचे कार्यकर्ते.
गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी अंगणातील आकाशकंदील लावला, मुलांच्या सोबत फटाके फोडले आणि चिमुकल्यांना आपल्या हाताने लाडाने फराळ भरवला. दिवाळीची अशी भेट पाहून सर्वांचे चेहरे आनंदाने उजळले होते.
यावेळी साईनाथ मंडळाचे पीयूष शहा, नंदू ओव्हाळ, अभिषेक निंबाळकर व अजिंक्य मित्र मंडळाचे उमेश शेवते, अजिंक्य भुजबळ, सुशांत साळवी व गुंजन शेवते यांनी आयोजन केले होते. बेलवडे गावाचे रवी जाधव उपस्थित होते. पुण्यातील गणेश मंडळांनी दिवाळीनिमित्त दिलेल्या या आनंददायी भेटीमुळे वस्तीवरील लहान मुले, त्यांचे पालक तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.