aappansare.in

Social

ग्रेस फाऊंडेशन आयोजित गुणीजान बंदिश स्पर्धा

Share

उपउपांत्य फेरीसाठी 11 स्त्री स्पर्धकांच्या नावांची घोषणा

पुणे : गुणीजान रिसर्च आर्ट कल्चर अँड एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे (ग्रेस) आयोजित गुणीजान बंदिश स्पर्धेच्या स्त्री विभागातून उपउपांत्य फेरीत पोहोचलेल्या 11 स्पर्धकांच्या नावांची आज (दि. 16) घोषणा करण्यात आली. यातून सहा स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड केली जाणार आहे.

गुणीजान रिसर्च आर्ट कल्चर अँड एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे (ग्रेस) प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पद्मभूषण पंडित सी. आर. व्यास यांच्या 100व्या जयंतीनिमित्त देशपातळीवर गुणीजान बंदिश स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पंडित व्यास यांच्या बंदिशींवर आधारित या स्पर्धेची उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी 19 ऑक्टोबर 2024  पर्यंत डॉ. श्रीराम लागू रंगावकाश, हिराबाग, पुणे (ज्योत्स्ना भोळे सभागृह आवार) येथे होत आहे.

मंगळवार आणि बुधवारी महिला गटातील स्पर्धकांची उपउपांत्य फेरी झाली. त्यातून उपांत्य फेरीसाठी आद्या मुखर्जी, सोमदत्ता चॅटर्जी, युगंधरा केचे, नेहा गुरव, गौरी गंगाजळीवाले, अंजली गायकवाड, प्राची खोत, नंदिनी गायकवाड, स्वराली जोशी, स्वाती तिवारी, तेजस्विनी वेर्णेकर यांची नावे  आज जाहीर करण्यात आली. स्पर्धेचा निकाल पंडित सुहास व्यास यांनी जाहीर केला. ज्येष्ठ गायिका अभिनेत्री निर्मला गोगटे, पद्मश्री तालयोगी पंडित सुरेश तळवलकर, पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर, पद्मभूषण पंडित साजन मिश्रा, पद्मश्री पंडित सतिश व्यास, विदुषी देवकी पंडित, ग्रेस फाऊंडेशनचे संस्थापक शशी व्यास, स्पर्धेच्या संकल्पक-गायिका अपर्णा केळकर आदी उपस्थित होते.

पुरुष गटातील उपउपांत्य फेरीला आज (दि. 16) सुरुवात झाली. नटभैरव, शुद्ध कल्याण, हमीर, देसी, बागेश्री आदी रागांमध्ये रचलेल्या पंडित सी. आर. व्यास यांच्या बंदिशी सादर करण्यात आल्या. पुण्यासह चिपळूण कोलकाता, इंदोर, बेंगळुरू, छत्तीसगड येथून स्पर्धक सहभागी झाले आहेत. पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर, पद्मभूषण पंडित साजन मिश्रा, पद्मश्री पंडित सतिश व्यास, विदुषी अश्विनी भिडे-देशपांडे परीक्षक आहेत. स्पर्धकांना निलय साळवी, लिलाधर चक्रदेव, सौमित्र क्षीरसागर (संवादिनी), कार्तिकस्वामी, कौशिक केळकर (तबला) यांनी साथसंगत केली.

उपांत्य फेरीतून निवड झालेल्या स्त्री व पुरुष स्पर्धकांची अंतिम फेरी दि. 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजेपासून सुरू होणार आहे. तर पारितोषिक वितरण समारंभ रविवार, दि. 20 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

देशपातळीवर आयोजित करण्यात आलेल्या गुणीदास बंदिश स्पर्धेतील सादरीकरण रसिकांसाठी खुले असून पुण्यातील संगीतप्रेमींनी आवर्जून उपस्थिती लावून स्पर्धकांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

OLYMPUS DIGITAL CAMERA

 गुणीजान बंदिश स्पर्धेच्या स्त्री विभागातील उपांत्य फेरीसाठी निवड झालेल्या स्पर्धकांची नावे जाहीर करताना पंडित सुहास व्यास. समवेत देवकी पंडित, पंडित साजन मिश्रा, पंडित सतिश व्यास, पंडित उल्हास कशाळकर, विदुषी निर्मला गोगटे, पंडित सुहास व्यास, तालयोगी पंडित सुरेश तळवलकर, विदुषी अश्विनी भिडे-देशपांडे, शशी व्यास, अर्पणा केळकर.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Up