aappansare.in

Social

गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणे हेच खरे समाजकार्य : विद्याधर अनास्कर भोलासिंग अरोरा यांना आडकर फौंडेशनतर्फे जिद्द जीवनगौरव पुरस्कार प्रदान

Share

पुणे : खरे समाजकार्य म्हणजे ज्याला मदत करायची त्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणे होय. तुम्ही केलेल्या मदतीचे ओझे, दबलेपण मदत घेणाऱ्याच्या चेहऱ्यावर दिसता कामा नये. लंगरच्या माध्यमातून सर्व समाजातील गरजू, भुकेलेल्यांना भोलासिंग अरोरा देवाचे कार्य मानून अन्नदान करीत खरेखुरे समाजकार्य करीत आहेत, असे गौरवोद्गार ज्येष्ठ बँकींग तज्ज्ञ, शिखर बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी काढले. कुटुंबिय व समाजाला सार्थ अभिमान वाटावा असे कार्य भोलासिंग अरोरा यांच्याकडून जिद्दिने व सातत्याने केले जात आहे, असेही ते म्हणाले.
आडकर फौंडेशनतर्फे गुरुद्वारा श्री गुरू सिंघ सभाचे अध्यक्ष भोलासिंग अरोरा यांचा आज (दि. 27) जिद्द जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण अनास्कर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर, महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचे मुख्य संयोजक विठ्ठल गायकवाड, आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर मंचावर होते.
समाजात उत्तम काम करणाऱ्या व्यक्तींची पारख करून त्यांचे कार्य समाजापुढे आणणे आडकर फौंडेशनच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे सातत्याने केले जात आहे या विषयी अनास्कर यांनी आनंद व्यक्त केला.

कुणी उपाशीपोटी झोपू नये हे ध्येय : भोलासिंग अरोरा
सत्काराला उत्तर देताना भोलासिंग अरोरा म्हणाले, एकदा हातात घेतलेले काम जिद्दीने, वेळेत आणि उत्तमरित्या करणे यावर माझा विश्वास आहे. हा पुरस्कार माझ्या कार्यासाठी शाबासकीची थाप आहे. गुरू नानकदेव महाराज यांचे कार्य मी पुढे नेत आहे या भावनेने लंगर वाटतो आहे. तिरस्कार नव्हे तर कामाचा पुरस्कार व्हावा या भावना असलेल्या व्यक्तींच्या हातून माझ्या कार्याचा केला जाणारा गौरव महत्त्वाचा आहे. ध्येयवेडा या शब्दाला जागून माझ्या हातून कार्य घडत आहे. पुणे शहरात कोणीही व्यक्ती रिकाम्या पोटी झोपू नये हे ध्येय घेऊन माझी पुढील वाटचाल अखंडितपणे सुरूच राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.
सचिन ईटकर म्हणाले, भोलासिंग अरोरा यांचे समाजकार्य समाजाप्रती असलेल्या प्रेमातून घडत आहे. समाजात आदर्शवत काम करणाऱ्या व्यक्तींचे कार्य समाजापुढे आल्यास सामाजिक नकारात्मकता कमी होऊन सकारात्मक भावना वाढीस लागेल. विठ्ठल गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.

स्वागतपर प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, जिद्द पुरस्कारातून प्रेरणा घेऊन समाजकार्य करणारे हात निर्माण व्हावेत या हेतूने पुरस्काराचे वितरण केले जात आहे. भोलासिंग अरोरा हे कार्यसम्राट व्यक्ती असून भुकेलेल्यांना उत्तम प्रतीचे अन्नदान करणे ते लंगरच्या माध्यमातून अनेक वर्षे सातत्याने करीत आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृदुला कुलकर्णी-खैरनार यांनी तर सन्मान पत्राचे वाचन पल्लवी पाठक यांनी केले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आयोजित ‌‘जिद्द‌’ कविसंमेलनात प्रभा सोनवणे, क्षिप्रा शहाणे, वर्षा कुलकर्णी, डॉ. मिलिंद शेंडे, प्रतिभा जोशी, प्रतिमा कुलकर्णी, स्वाती दाढे, विद्या सराफ, विजय सातपुते, सुजित कदम, प्रतिभा मगर, कांचन पडळकर यांचा सहभाग होता.

आडकर फौंडेशन आयोजित जिद्द पुरस्कार वितरण सोहळ्यात (डावीकडून) विठ्ठल गायकवाड, ॲड. प्रमोद आडकर, भोलासिंग अरोरा, विद्याधर अनास्कर, सचिन ईटकर.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Up