आदर्श आई पुरस्कार हा समस्त मातृवर्गाचा सन्मान : ललिता सबनीस
Share
रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे पुरस्काराचे वितरण
आदर्श आई हा पुरस्कार माझ्या एकटीचा नसून समस्त मातृवर्गाचा आहे. मुलगा-मुलगी असा भेद न करता मी मुलांना समान वागणूक दिली. त्यांच्याशी मैत्रीचे नाते जपले. स्त्रीचा सन्मान करावा, असे संस्कार प्रत्येक आईने मुलांवर केल्यास समाजातील अपप्रवृत्तींना आळा बसेल, असे विचार प्रसिद्ध लेखिका, कवयित्री ललिता श्रीपाल सबनीय यांनी व्यक्त केले.
रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे आदर्श आई पुरस्काराने आज ललिता सबनीस यांचा गौरव करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. पुरस्काराचे वितरण रंगत-संगत प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष मैथिली आडकर यांच्या हस्ते झाले. पत्रकार भवन येथे आयोजित कार्यक्रमात रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांची प्रमुख उपस्थिती होती. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू असे पुरस्काराचे स्वरूप होते.
रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे ललिता सबनीस यांचा आदर्श आई पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्याची संधी मिळाल्याने पुरस्काराची उंची वाढली असल्याचे मैथिली आडकर यांनी सुरुवातीस सांगितले.
महात्मा फुले यांना पाहता आले नाही पण महात्मा फुले यांचे समग्र साहित्य वाचले आहे. श्रीपाल सबनीस हे आपल्या आयुष्यातील महात्मा फुले आहेत, असे आवर्जून नमूद करून ललिता सबनीस म्हणाल्या, आयुष्याच्या वाटचालीत पती श्रीपाल सबनीस तसेच सासूबाई यांनी कायम प्रोत्साहन दिले. त्यांच्या सहकार्यामुळेच यश कमावता आले.
पत्नीचा आदर्श आई पुरस्काराने गौरव केला जात असताना एका मंचावर बसता आले हा आनंदाचा क्षण आहे, असे सांगून डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, प्रत्येक स्त्री कर्तव्याच्या जाणीवेने वाटचाल करीत असते. मातेला वंदन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. महिलांबाबत समाजात चुकीच्या घटना घडत असताना मातृसंस्कृती पराभूत झाली का याविषयी विचारमंथन व्हायला हवे. मुलगा चुकला म्हणून आईला दोष देण्यात अर्थ नाही.
सुरुवातीस ॲड. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविकात पुरस्कारामागील भूमिका स्पष्ट केली. परिचय आणि मानपत्राचे वाचन वैजयंती आपटे यांनी तर सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले.
पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त आई विषयावर आयोजित कविसंमेलनात भारती पांडे, प्रभा सोनवणे, वेदस्मृति कृती, मीना सातपुते, मीनाक्षी नवले, तनुजा चव्हाण, हेमंत केतकर, मिलिंद शेंडे, मिलिंद जोशी, सीताराम नरके, स्वप्नील पोरे, डॉ. ज्योती रहाळकर यांचा समावेश होता.
रंगत-संगत प्रतिष्ठान आयोजित आदर्श आई पुरस्कार वितरण समारंभात (डावीकडून) ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर, ललिता श्रीपाल सबनीस, डॉ. श्रीपाल सबनीस